डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासामध्ये महत्त्वाचे योगदान- राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि.६ : जगभरातील लोक भारतीय संविधानाचे  निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते.

यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे, देशभरातील आलेले अनुयायी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान शिक्षणतज्ज्ञ होते, शोषितवर्गाचे शिक्षण झाले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. मागास, वंचित, बहुजनांना शिक्षण मिळण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्थांच्या माध्यमातून आजही काम सुरू आहे. महिलांच्या अधिकारासाठी कार्य केले आणि महिलांना सन्मान मिळवून दिला. इंदू मिल येथील निर्माणाधीन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण होईल, याचा मला विश्वास असल्याचेही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितले.

भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानानुसार भारतीय लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. भारतीय संविधान संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक कायदे तयार केले. अर्थव्यवस्था, ऊर्जा, सिंचन, महिला धोरण, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील धोरणांची आखणी केली आणि या धोरणाला मानवतेच्या विचारांची जोड दिली. त्यामुळेच देशाची एकता, बंधुता, एकात्मता या तत्त्वांना बळ मिळाले. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाचे महत्त्व आजच्या पिढीला लक्षात येण्यासाठी शासनाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. मा. सर्वोच्च न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. तसेच जगाला हेवा वाटेल असे इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच बरोबर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कामालाही वेग दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारत अतिशय वेगाने प्रगती करीत आहे. जगातील पाचव्या क्रमांकावरील भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला जाते. भारतीय संविधानाने  सकल बहुजनांना न्याय देण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंत्रीकाळातील कार्य भारताच्या निर्मितीतील महत्त्वाचे पाऊल ठरते. इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल. दीक्षाभूमी येथे २०० कोटीची विकास कामे सुरू केली आहेत. तसेच लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर शासनाने विकत घेतले आहे. तेथील संग्रहालयाला देश विदेशातील पर्यटक भेट देतात. जपान मधील कोयासन विद्यापीठ मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

देशाची  आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचेभव्य स्मारक उभारण्यात येत आहे, या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत असताना समाजात समता, बंधुता रुजवण्यासाठी यशस्वी लढा दिला. सर्वोत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती केली. शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, शेतीतज्ज्ञ,संरक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचे कार्य अलौकिक आहे. ते  दूरदृष्टीचे प्रशासक होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  सादर केलेल्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ प्रंबंधाला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे कार्य मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे आहे. यांच्या स्मृती जपण्यासाठी जे करावे लागेलं त्यासाठी शासन कटीबद्ध आहे. बौद्ध पंचायत समितीची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. या समितीचे जे कार्यालय आहे त्याचे काम अपूर्ण होते.  मुख्यमंत्री महोदयांनी यासाठी 25 कोटीचा निधी दिला आहे. यावर्षी या इमारतीचे काम पूर्ण होईल.

मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यासाठी शासकीय सुट्टी जाहीर केली, यासाठी मा. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. सिद्धार्थ कॉलेजच्या विकासासाठी निधी दिला, तसेच दि. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम आयोजन करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल शासनाचे आभार मानले.

यावेळी माजी खासदार नरेंद्र जाधव, भीमराव आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केले तर आयुक्त डॉ. श्री.चहल यांनी आभार मानले.

०००