मीरा भाईंदर क्षेत्रात कॅन्सर रुग्णालयासाठी निधी कमी पडू देणार नाही- मंत्री उदय सामंत
नागपूर,दि. 8 : मुंबई महानगर क्षेत्रातील रुग्णांसाठी मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याबाबत सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, जागा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला. यात भूखंड क्रमांक २१० हा रुग्णालय आणि प्रसूतीगृहासाठी आरक्षित आहे. तर भूखंड क्रमांक २११ हा वाचनालय आणि सामाजिक सभागृहासाठी आरक्षित आहे. त्यामुळे कर्करोग रुग्णालयासाठी अधिवेशन संपण्यापूर्वी आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव मागवण्यात येईल. तसेच जागा आरक्षण बदलाबाबत अधिवेशनात निर्णय घेतला जाईल. हे आरक्षण पूर्णपणे बदलण्याच्या प्रक्रियेला तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात कर्करोग रुग्णालयासाठी यापूर्वी निधी देण्यात आला असून निधी कमी पडू देणार नाही, असे मंत्री श्री.सामंत यांनी स्पष्ट केले.
मीरा भाईंदरचा विकास आराखडा लवकरच
मीरा भाईंदर महानगरपालिकेचा विकास आराखडा अद्याप अंतिम झाला नाही. या आराखड्याबाबत सदस्य आशिष शेलार यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मीरा भाईंदर महानगरपालिकेचा विकास आराखडा राज्य शासनाकडे आलेला आहे. या आराखड्याबाबत हरकती, सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू असून हा आराखडा लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी राज्य शासन सकारात्मक पावले उचलत आहे. कर्करोग रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे ती सुविधा लवकरच मुंबई महानगर क्षेत्रातील आणि मीरा भाईंदरमधील नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचे सांगून सदस्य गीता जैन यांनी शासनाचे आभार व्यक्त केले.
००००
महाड येथील कंपनीतील स्फोटप्रकरणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही – कामगार मंत्री सुरेश खाडे
नागपूर दि. 8: महाडमधील ब्ल्यू हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी नेमलेल्या समितीचा अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना मंत्री श्री. खाडे बोलत होते.
महाडमधील ब्ल्यू हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीमध्ये सात कामगार ठार झाल्याची घटना नोव्हेंबर 2023 मध्ये घडली होती. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान आणि भरपाई देण्यात आली आहे. याशिवाय राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत जे लाभ देय आहेत ते देण्यात येत आहेत. याशिवाय त्यांच्यापैकी काही कामगारांच्या वारसांना कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर झाले आहे. त्याचबरोबर योग्य ती मदत या कामगारांच्या वारसांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून संबंधितांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गणपत गायकवाड यांनीही सहभाग घेतला.
000
आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणासाठी आदर्श कार्यपध्दती तयार करणार- आरोग्यमंत्री प्रा.तानाजी सावंत
नागपूर, दि.8 : राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण्यासाठी आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील आरोग्य सुविधेबाबत सदस्य अबू आझमी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.सावंत बोलत होते.
आरोग्यमंत्री श्री.सावंत म्हणाले, आरोग्य व्यवस्थेत उपलब्ध संसाधनांचा 100 टक्के वापर चांगल्या पद्धतीने करणे, विभागातील आशाताईंपासून डॉक्टर, नर्स या मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढवणे आणि रुग्णांसोबत आत्मियतेने वागण्याबाबतची आदर्श कार्यपध्दती (एसओपी) करण्याचे काम सुरू आहे. रुग्णालय इमारत आदी संसाधनांची दुरुस्ती करून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करण्याचे काम सुरू आहे.
आरोग्य व्यवस्थेसाठी राज्य शासनाने वेळोवेळी मदत केली आहे. राज्यातील 12 कोटी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य व्यवस्था सुधारण्याची गरज वाढली आहे. आरोग्य व्यवस्थेत वाढ होणे आणि अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ होणे अपेक्षित आहे. सन 2012 पासून बिंदूनामावली तयार नव्हती ती करण्यासाठी देखील एसओपी करण्याचे काम सुरू असून मॉडेल आरोग्य यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचे परिणाम येत्या काळात दिसून येतील, असेही त्यांनी सांगितले.
पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील असुविधेबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक
भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील शवागारात शवपेट्या नादुरुस्त असल्यामुळे मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवावे लागल्याचा प्रकार घडला होता. या रुग्णालयातील शवागारात शवपेट्या खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधी देऊन शवपेट्या खरेदी करण्याच्या सूचना आजच देण्यात येतील. हे रुग्णालय महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. रुग्णालयातील असुविधेबाबत लवकरच मा.मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री श्री. सावंत यांनी सभागृहात सांगितले.
या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य प्रताप सरनाईक, बच्चू कडू, मनीषा चौधरी यांनी सहभाग घेत उपप्रश्न उपस्थित केले.
०००
नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार- आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत
नागपूर, दि. ८ – नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीत दुर्गम भागात आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. या समितीकडून एक महिन्यात अहवाल मागवला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी दिलेल्या उत्तरात मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली.
राज्य शासनाच्या सुरु असलेल्या उपयायोजनांमुळे बालकांचा मृत्युदर कमी होत आहे. नवजात शिशुंची विशेष काळजी घेण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात आजारी नवजात शिशूच्या उपचाराकरिता एकूण 52 विशेष नवजात काळजी कक्ष (SNCU) स्थापन करण्यात आले असून त्याअंतर्गत श्वसनाच्या उपचाराकरिता (सीपीएपी)मशीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या कक्षात बालरोग तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विशेष नवजात काळजी कक्षामधील वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका यांचे प्रशिक्षण राज्यस्तरावरुन घेण्यात आले असल्याची माहिती मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी दिली.
याशिवाय, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुसज्ज प्राथमिक अतिदक्षता केंद्र (PICU) तसेच बालरोग व नवजात अतिदक्षता केंद्र (NICU) उपलब्ध आहेत. तेथे रुग्णखाटा व्हेंटीलेटरसह उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या बालकांना रुग्णालय प्रशासनातर्फे सुयोग्य उपचार देण्यात येतात. कुठलाही रुग्ण उपचाराविना वंचित राहत नाही. सर्व आजारी नवजात शिशुकरिता शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत औषधे, तपासण्या तसेच वाहतूक लाभ देण्यात येतो. तसेच नवीन सुविधा वाढविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सन 2018-19 मध्ये 37 विशेष नवजात काळजी कक्ष कार्यरत होते, तर सन 2023-24 मध्ये 52 विशेष नवजात काळजी कक्ष कार्यरत आहेत. माता व नवजात बालकांना तज्ज्ञ सेवा मिळण्यासाठी रुग्णालयांना प्रथम संदर्भ सेवा केंद्र म्हणून स्थापित केले आहे व तेथे स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, रक्ताची सोय, सोनोग्राफी, सिझेरीयन सेक्शनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच मोफत संदर्भ सेवा आजारी नवजात बालकांसाठी उपलब्ध करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्यात माता व बालकांच्या आरोग्याकडे सतत व विशेष लक्ष दिल्याने अर्भक मृत्यू दर 16 तर बालमृत्यु दर 18 झालेला आहे. देशातील मोठ्या राज्यांमध्ये हा दर कमी करण्यामध्ये राज्याचा तिसरा क्रमांक आहे. यात सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करीत आहे. तसेच पायाभूत सविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालये यांची आवश्यकतेनुसार नवीन निर्मिती करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सदस्य रवी राणा, योगेश सागर, प्रताप अडसड, राजेश एकडे, राम सातपुते यांनी या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.
0000
ठाणे मनपा क्षेत्रातील शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्वांगीण आराखडा- मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. 8: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिका शाळांच्या दुरुस्तीबाबत सर्वांगीण आराखडा तयार करण्यात येईल. सर्वोच्च प्राथमिकता असणाऱ्या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती केली जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर शाळांची दुरुस्ती करण्यात येईल. यासाठी महानगरपालिकेकडे निधीची कमतरता असेल, तर जिल्हा नियोजन मंडळाकडून त्यासाठी निधी मिळण्याबाबत पालकमंत्र्यांना विनंती करण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य संजय केळकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण 93 इमारती / संरचनेत एकूण 194 शाळा व बालवाड्या भरत आहेत. शिक्षण विभागामार्फत 34 शाळा व 11 बालवाडी दुरुस्ती करण्याकरिता केलेल्या मागणीच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेमार्फत माहे मार्च, 2023 पासून या शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहे. या शाळांच्या इमारती (शाळा व बालवाडीसह) ऑडिट करण्याकरीता प्रस्ताव तयार करण्यात आला असून महानगरपालिकेच्या तालिकेवर नियुक्त असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर्समार्फत स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे ते म्हणाले.
ठाणे महानगरपालिकेच्या शाळांपैकी सद्य:स्थितीत शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 34 शाळा व 11 बालवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करुन त्यास मंजुरी घेऊन निविदा मागविण्यात आल्या. सद्य:स्थितीत ही कामे महानगरपालिकेच्या विविध प्रभागामध्ये सुरु असून, सुमारे 70 टक्के काम पूर्ण करण्यात आले असल्याचे ठाणे महानगरपालिकेने कळविले असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा इमारतीच्या दुरुस्तीची निकड व उपलब्ध आर्थिक तरतूद या बाबींचा विचार करून शाळा इमारती दुरुस्तीचे कामे महानगरपालिका हाती घेत आहे. तसेच या शाळांच्या इमारतींची तपासणी व सुरक्षा उपाययोजना इ. बाबी लक्षात घेता, शाळांचे दुरुस्ती व नुतनीकरण प्राधान्याने करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
0000