नाशिक, दिनांक : 9 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): संपूर्ण देशभरात जन जातीय गौरव दिन (15 नोव्हेंबर) पासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध 17 योजनांची माहिती घेऊन अधिकाधिक लाभार्थ्यांनी या जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले.
पेठ तालुक्यातील उस्तळे ग्रामपंचायत येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आयोजित जनजागृती कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उप विभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, तहसीलदार अनिल पुरी, गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी जयवंत गारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार म्हणाल्या, या विकसित भारत संकल्प यात्रेच्या व्हॅनमध्ये योजनांची माहिती असणारे फलक लावण्यात यावेत. तसेच ज्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाला आहे, त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी. त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामसेवकांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात येऊन त्यावर कमीत कमी वेळात कार्यवाही करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या. त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासन नागरिकांसाठी विविध विकासाच्या योजना राबवित आहेत. या योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपला विकास साधण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा ही 26 जानेवारी 2024 पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये जाणार आहे. आतापर्यंत ही यात्रा जिल्ह्यातील साधारण 300 गावात फिरली असून त्यामध्ये अंदाजे सव्वालाख लाभार्थी विविध योजनांमध्ये सहभागी झाले आहेत. या यात्रेच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी यावेळी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात 15 नोव्हेंबर रोजी दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या विकसित यात्रेला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील 15 तालुक्यांसाठी 14 आयईसी व्हॅन मिळाल्या आहेत. या व्हॅनच्या माध्यमातून दररोज प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये जाऊन विविध प्रकारच्या 17 जनकल्याणकारी योजनांची जनजागृती करीत असून विविध योजनांची माहिती नागरिकांना देत आहेत. या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळणार असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी नोंदणी करावी, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविकात सांगितले.
विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे देशातील विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड व इतर योजनांच्या आदेशाचे वाटप करण्यात आले.
0000000