देवगड येथील समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

मुंबई, दि. ९:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात पुण्यातील एका खासगी अकादमीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला धोकादायक समुद्र किनारा परिसरात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. समुद्र किनारी धोकादायक परिस्थिती असेल तर स्थानिकांकडून दिली जाणारी माहिती व प्रशासनाकडून दिला जाणारा इशारा याकडे पर्यटनासाठी गेलेल्यांनी दुर्लक्ष करू नये असे आवाहनही केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे.
000