मुंबई, दि. 17 : राज्यात कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठे, महाविद्यालये दि. 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आपत्कालीन परिस्थिती वगळता प्राध्यापकांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची परवानगी देण्यात आली आहे. याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही परिस्थितीनुसार अशी परवानगी देण्याबाबत शासन निर्णय घेईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
श्री.सामंत म्हणाले, विद्यापीठे, महाविद्यालये बंद असले तरी विद्यापीठाचे कुलगुरु, उपकुलगुरु, कुलसचिव, उपकुलसचिव तसेच महाविद्यालये/तंत्रनिकेतनचे प्राचार्य/संचालक/अधिष्ठाता, यांनी नियमितरित्या कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असते. शैक्षणिक वेळापत्रक, प्रशासकीय परिस्थितीचा अभ्यास करुन, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या सर्व परिस्थितीचा विचार करुन आवश्यकतेनुसार प्राध्यापकांप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ संदर्भात निर्णय तातडीने घेण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.
००००
काशीबाई थोरात/विसंअ/17.3.2020