लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठात पायाभूत सोई सुविधा उपलब्ध करून देणार –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १६: लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याला पूर्वीच मान्यताही दिली आहे. त्यामुळे भविष्यात या विद्यापीठात पायाभूत सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले. लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संमेलनात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मंचावर एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजू मानकर, फूड अँड गव्हर्न्ससचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, लोकसारंग हरदास, माधव लाभे, उत्कर्ष खोपकर, मोहन पांडे आदींची उपस्थिती होती.

ही तंत्रज्ञान संस्था उभी करण्यामध्ये डी. लक्ष्मीनारायण यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे योगदान हे संस्थेच्या जीवनपटातील मोठी घटना असल्याचे सांगून, वर्षभरापूर्वी स्वायत्त संस्थेत रुपांतर व्हावे, अशी संस्थेची मागणी होती. मात्र आता हे अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ झाले असून, आपण दिलेला शब्द पाळल्याचा आनंद होत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचा २५० कोटी रुपयांचा आराखडा पूर्वीच तयार करण्यात आला असून, त्याला मान्यताही दिली आहे. त्यामुळे भविष्यात या विद्यापीठात पायाभूत सोयीसुविधा उभरणीसाठी मोठा निधी दिला जाईल, असे सांगून त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पायाभूत सोयीसुविधांसाठी निधी दिल्याचे सांगितले. त्याच धर्तीवर या संस्थेच्या पायाभूत सोयीसुविधा अतिशय उत्तम दर्जाचा उभारून भविष्यात ही संस्था प्रिमीयम इंस्टिट्यूट म्हणून नावारुपास यावी, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

संस्था उभारणीस माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे राहणार असून, त्यांनी संस्थेसोबत टाय-अप करून स्वयंपूर्णतेकडे कसे जाता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. सध्याचे जग हे तंत्रज्ञानाचे असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2030 पर्यंत देशाच्या 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या आर्थिक सामर्थ्याचे महाराष्ट्र हे प्रवेशद्वार ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. कुठल्याही देशाच्या विकासामध्ये तंत्रज्ञानाचा वाटा महत्त्वपूर्ण असतो. अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये तंत्रज्ञानाचा वाटा मोलाचा असणार आहे. पारदर्शकता आणि गतिमानता  तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येण्यास मदत होत असून अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

एलआटीच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी अतिशय उत्तम प्रयत्न केल्यामुळे या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा आणि स्थान मिळाले आहे. उच्च व तंत्र शिक्षणात तंत्रज्ञानालाच महत्त्वाचे स्थान राहिले असून, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ते कसे वापरले, त्यातून कोणती निर्मिती केली, याला अधिक महत्त्व असते, असे सांगून त्यांनी या विद्यापीठासारखी इतर विद्यापीठांनी व्यवस्था निर्माण करावी, असा आशावाद उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

कुलगुरु डॉ. राजू मानकर यांनी या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाची एलआयटी ही मातृसंस्था असल्याचे सांगून, आता त्याचे विद्यापीठात रुपांतर झाल्याचे सांगितले. त्यांनी उपमुख्यमंत्री यांनी वर्षभरात या संस्थेची केवळ स्वायत्त संस्था करावी, अशी मागणी केली होती. मात्र वर्षभरात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केलेल्या कामगिरीबाबत माहिती दिली. त्याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचेही आभार मानले.

यावेळी जी. डी यादव, लोकसारंग हरदास यांचीही समायोचित भाषणे झाली. माधव लाभे यांनी प्रास्ताविकातून संस्थेची माहिती दिली.

लिटा संवाद या नियतकालिकाच्या वार्षिकांकाचे तसेच विद्यापीठाच्या ध्वजाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रोफेसर डॉ. सुधीर भगाडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अजय देशपांडे, मनोज पलरेचा यांनाही युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर डॉ. गिरीजा भरत यांचा महिला गटातून शाल श्रीफळ, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तर चिन्मय गारव यांना यंदाचा युथ आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकसारंग हरदास यांनी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पायाभूत सोयीसुविधा उभारणीसाठी 1.6 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

डॉ. सुगंधा गाडगीळ आणि सचिन पळसेकर यांनी सूत्रसंचालन तर माधव लाभे यांनी प्रास्ताविक केले. ‘लिटा’चे सचिव उत्कर्ष खोपकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००