‘शासन आपल्या दारी’अभियानासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे-  पालकमंत्री उदय सामंत

0
11

★रायगड येथे ५ जानेवारी २०२४ रोजी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

★शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी कार्यक्रमस्थळी शासनाच्या विविध विभागांचे दालन उभारणार

रायगड,दि. १६ (जिमाका): खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने ‘शासन आपल्या दारी’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

‘शासन आपल्या दारी’ या अभियानानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दि.5 जानेवारी 2024 रोजी रायगड जिल्हा दौरा आहे. यासंदर्भात माणगाव तालुक्यातल लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापाठ लोणेरे येथील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच  इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले की, सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागाकडे जावून योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही. अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा व जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी शासनाने ‘शासन आपल्या दारी’ ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.रायगड जिल्ह्यातील या कार्यक्रमासाठी अंदाजे 1 लाख महिला, पुरुष उपस्थित राहणार आहेत. या सर्व नागरिकांची  गैरसोय होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ एकाच दिवशी विक्रमी संख्येने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला असल्याचे सांगून पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार व स्वयंरोजगार, कामगार यासह विविध शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. या उपक्रमात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचे दालन उत्कृष्टरित्या उभारावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच हा उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करू,असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या  तालुकानिहाय महसूल, कृषी, कामगार, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीची माहिती घेवून या लाभार्थ्यांची कार्यक्रमस्थळी आणण्याची, पाणी, भोजन, मोबाईल टॉयलेट याची व्यवस्था याबाबतचा आढावा पालकमंत्री यांनी यावेळी घेतला.

वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब याबाबतचे नियोजन करण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरोग्य विभाग, नगरपालिका, परिवहन महामंडळ आदी विभांगाना सूचना देण्यात आल्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलीस विभागाला मंत्री श्री सामंत यांनी दिल्या.

महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी सर्व विभागानी काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रत्येक विभागाने नेमून दिलेली कामे मुदतीत व उत्कृष्टपणे पूर्ण करावीत. या उपक्रमासाठी सर्वांचा सक्रिय सकारात्मक सहभाग  महत्वाचा असल्याचेही सांगून त्यांनी नियोजनामध्ये आवश्यक त्या सूचना यावेळी केल्या.

जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची विभागनिहाय सविस्तर माहिती यावेळी दिली.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here