छत्रपती संभाजीनगर दि १६: विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत देशाच्या सर्व भागात जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरासह जिल्हाभरात विकसित भारत संकल्प यात्रा’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.
इटावा (ता. गंगापूर) येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, सहायक गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार, सरपंच कैलास शिनगारे, उपसरपंच बाबासाहेब घुले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, सामाजिक कार्यकर्ते संजय खांबायते, दीपक बडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे तसेच यामाध्यमातून लाभार्थी कुटुंबाच्या जीवनात बदल घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवा. विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मिशन मोडवर काम करा, असे ते यावेळी म्हणाले.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. राज्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे त्यांना आवश्यक ते उपचार मिळावेत यासाठी जनतेला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सोयही शासनाने केली आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डीबीटीद्वारे निधी वितरण करण्यात येत आहे. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना,उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवा, असे निर्देश त्यांनी सबंधित यंत्रणेला दिले.
आपल्या देशाला जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनविण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यासाठी देशातील प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे.शासन आपल्या पाठीशी आहे, असे डॉ.कराड यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल व योजना गावागावात पोहचविण्यासाठी ही संकल्प यात्रा आपल्या गावात आली असल्याचे सांगून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामवत यांनी संकल्प यात्रेचे आयोजन व विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे डॉ.कराड यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थ व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
०००