यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेनंतर्गत जिल्ह्यातील ३०७४ घरकुलांसाठी ३८ कोटींचा निधी मंजूर

यवतमाळ, दि.18 (जिमाका) : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यांतील एकूण ३०७४ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाने कार्योत्तर मान्यता दिली  आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याने या घरकुलांसाठी जिल्ह्याला ३८ कोटी ३६ लाख ३५ हजार २०० रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीपैकी यापूर्वी ४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधीमधून घरकुल लाभार्थ्यांसाठी आता ८ कोटी  ५९ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचा शासन निर्णय १४ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील गोरगरीब, गरजूंना घरकुल मिळावे अशी मागणी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे सातत्याने होत होती. त्यांनी ही मागणी शासनस्तरावर सातत्याने लावून धरली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळत आहे. पालकमंत्री श्री राठोड हे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणात निधी खेचून आणत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यात सध्या हजारो कोटींची कामे सुरू आहेत.

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी ग्रामीण भागातील कुटुंबांना जमीन उपलब्ध करुन देऊन त्यावर त्यांना घरे बांधून देणे व उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबांना विविध शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत घरकुल बांधकामासाठी यवतमाळ जिल्ह्यातील ३०७४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.  या लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिल्याने अनेकांचे घराचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. उर्वरित निधी हा लवकरच प्राप्त होणार आहे. याशिवाय गरजूंची संख्या पाहता घरकुलांची संख्या वाढवण्यासाठी पालकमंत्र्यांनी शासनस्तरावर प्रयत्न सुरू केले आहे.

“राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील गोरगरीब, गरजूंसाठी घरकुलाची स्वतंत्र योजना नव्हती. त्यासाठी आमच्या सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील गरजूंना घरकुल दिले जात आहे. या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. घरकुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यासाठी घरकुलांची संख्या वाढविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. घरकुल वाटपात गैरप्रकाराच्या तक्रारीही होत आहेत. त्यांच्या तक्रारींची दाखल घेतली जाईल. नागरिकांना काही तक्रारी असल्यास भीती न बाळगता माझ्याकडे किंवा कार्यालयात तक्रार द्यावी”, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

000