विधानसभा प्रश्नोत्तरे 

खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर शासकीय रुग्णालयात दोन विभाग करण्याचा विचार – मंत्री हसन मुश्रीफ

नागपूर, दि. 20 : मोठ्या शहरांमध्ये असलेल्या खासगी रुग्णालयात प्रशासकीय व वैद्यकीय विभाग कार्यरत असतात. त्यामुळे डॉक्टरांना प्रशासकीय कामकाजात लक्ष देण्याची गरज नसते. याच धर्तीवर राज्यातील शासकीय रुग्णालयात असे दोन विभाग करण्याचा शासन विचार करीत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य सुभाष धोटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील चर्चेत सदस्य नाना पटोले, डॉ. राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, प्रतिभा धानोरकर, अमित देशमुख, प्रणिती शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोविड काळात चंद्रपूर रुग्णालयात जेम पोर्टल माध्यमातून वैद्यकीय साहित्य व अनुषंगिक वस्तूंची खरेदी केली आहे. कोविड काळात इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स प्लॅन मधून खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून चंद्रपूर रुग्णालयात खरेदी देखील करण्यात आली आहे. याबाबत काही अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आल्यास चौकशी करण्यात येईल.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयातील वर्ग १, वर्ग २ रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत एप्रिल २०२४ पर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच वर्ग ३ संवर्गाच्या ५६०० पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया टी सी एस कंपनीमार्फत सुरू आहे. डिसेंबर अखेर आदेश निघणार आहे. तसेच वर्ग ४ पदांची भरती बाह्य तत्वाद्वारे लवकर करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

———————-

जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत विचार – मंत्री गिरीश महाजन

 नागपूर, दि. २०: राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल. तसेच जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये सोलर सिस्टीम बसविण्याची प्रलंबित कार्यवाही येत्या दोन महिन्यात करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य संजय सावकारे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, शासकीय आश्रम शाळा, लालमाती, ता. रावेर येथे सन २०११ मध्ये सौर यंत्रणा बसविण्यात आली होती. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१९-२० अंतर्गत अपारंपरिक ऊर्जा विकास या योजनेतून रावेर तालुक्यातील १७ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सौर यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र, शासकीय आश्रम शाळा लालमाती, ता. रावेर येथील सौर यंत्रणा नैसर्गिक आपत्तीमुळे (वादळामुळे) काही युनिट बंद पडले आहेत. हे बंद युनिट तातडीने सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी सदस्य प्राजक्त तनपुरे, प्रकाश आबिटकर आणि ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपप्रश्न विचारले.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

————————-

स्वारगेट – कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार- मंत्री उदय सामंत

नागपूर, दि.२० : पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित आहे. या  प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य भीमराव तापकीर यांनी पुणे मेट्रो टप्पा १ आणि २ मध्ये स्थानकाची वाढ करण्यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासन त्याचा पाठपुरावा करून मंजूरी घेईल. खडकवासला ते खडारी हा २५.६५ किमीच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. तो देखील मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. या मेट्रोचे शेवटचे स्टेशन खडकवासला धरणापर्यंत असावे अशी मागणी केलेली आहे. त्याची देखील संयुक्त पाहणी झालेली आहे. तो प्रस्ताव फिजिबिलिटी रिपोर्टसह शासनाकडे सादर केलेला असून राज्य शासन त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

०००

पवन राठोड/विसंअ

————————–

बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी विशेष मोहीम– मंत्री हसन मुश्रीफ

नागपूर, दि. २० : बनावट पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधण्यात येईल. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी ‘विशेष मोहीम’ राबविण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अजय चौधरी, प्रताप सरनाईक, योगेश सागर, प्रा. वर्षा गायकवाड, राजेश टोपे, रवींद्र वायकर, अमित देशमुख यांनी भाग घेतला.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय आयोग संस्थेत नोंदणी करणे बंधनकारक आहे.  राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. परदेशातून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यक विज्ञान परिषद व महाराष्ट्र वैद्यकीय आयोग या दोन्ही संस्थांमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच एक वर्षाची वैद्यकीय क्षेत्रात आंतरवासिता (इंटरशीप) करणेही बंधनकारक आहे.

परदेशात बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेले १२३ विद्यार्थी २०२२-२३ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सी.बी.आय) माध्यमातून देशात शोधण्यात आले. यामध्ये राज्यातील ३ विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.  केंद्र सरकारने याबाबत नियमात बदल केला असून चीन, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशातून वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची परीक्षा देण्याची अट नाही. मात्र, अन्य राष्ट्रातून पदवी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे आवश्यक आहे. त्यांनतर त्यांना देशात वैद्यकीय व्यवसाय करता येतो, अशी माहितीही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधून कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. या समित्यांना सातत्याने बोगस डॉक्टर शोधून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/