कोविड नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा

छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका)- कोविड च्या JN-1 हा नवीन व्हेरियंट राज्यातील काही शहरात आढळून आल्याच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी परस्पर समन्वय राखावा. तसेच सर्व सुविधा, यंत्र सामुग्री, चाचणी किट, औषधीसाठा आदींबाबत खबरदारी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज येथे दिले. अद्याप या व्हेरियंटचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळून आलेला नाही, अशीही माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्कता बाळगावी. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी केले.

यासंर्द्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यस्तरीय आढावा घेण्यात आला. या आढाव्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रेरणा संकलेचा, डॉ. अर्चना राणे, डॉ. लढ्ढा आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांनी परस्पर समन्वय राखावा, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशानुसार, ताप. सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची चाचणी करण्यात यावी. तसेच आवश्यक औषधी साठा, उपचार सुविधा अन्य सर्व अनुषंगिक यंत्र व उपचार सुविधा सुसज्ज ठेवण्यात याव्या,असे निर्देश त्यांनी दिले.