नवी दिल्ली, दि. 28 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री श्री.वैष्णव यांनी मंत्री श्री.केसरकर यांच्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करणे, केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ आणि ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये सावंतवाडी स्थानकाचा समावेश करणे, सावंतवाडी स्थानकामध्ये पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम सुविधा सुरू करणे आदींसह विविध रेल्वेगाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देणे अशा सर्व मागण्या तत्त्वतः मान्य केल्या व याबाबत कार्यवाहीच्या सूचना रेल्वे प्रशासनास दिल्या. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या (केआरपीए) मागण्यांच्या अनुषंगाने मंत्री श्री. केसरकर यांनी मंत्री श्री.वैष्णव यांच्याकडे याबाबतची विनंती केली होती.
सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम निधीअभावी थांबले आहे. यासाठी आवश्यक असलेला नऊ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून कामाला गती द्यावी, अशी विनंती मंत्री श्री.केसरकर यांनी केली होती. यास रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. कोकणातील प्रवाश्यांना अधिक चांगली सुविधा मिळावी यादृष्टीने सावंतवाडी स्थानकाचा केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ आणि ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीला देखील तत्काळ प्रतिसाद देत श्री.वैष्णव यांनी मान्यता दिली. सर्व प्रवाशांबरोबरच विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणारी पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम सावंतवाडी स्थानकावर सुरू करण्यास देखील त्यांनी होकार दर्शविला.
याशिवाय गाडी क्रमांक २२६५३, २२६५४, २२६५५, २२६५६ यांना सावंतवाडी स्थानकावर थांबा देणे, मुंबई – मंगलोर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस, मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, एर्नाकुलम हजरत निझामुद्दीन मंगला एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस – त्रिवेंद्रम नेत्रावती एक्सप्रेस, एर्नाकुलम – हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.), त्रिवेंद्रम – हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.), एर्नाकुलम – अजमेर मरूसागर एक्सप्रेस (साप्ता.), लोकमान्य टिळक टर्मिनस – करमाळी एसी सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.), एर्नाकुलम – ओखा एक्सप्रेस या गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर नियमित थांबा देण्याची विनंती देखील मंत्री श्री.वैष्णव यांनी मान्य केली. सावंतवाडी स्थानकावरून चांगले उत्पन्न असताना देखील नागपूर – मडगाव स्पेशल एक्सप्रेसचा रद्द केलेला सावंतवाडी स्थानकावरील थांबा तत्काळ सुरू करण्यात यावा, या मागणीला देखील सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्री श्री.वैष्णव यांनी ही मागणी मान्य केली.
या बाबींचा लाभ केवळ कोकणातील नव्हे, तर या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाश्यांना होणार असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर यांनी या मागण्या मान्य केल्याबद्दल तसेच वेळोवेळी केलेल्या रेल्वेसंदर्भातील मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याबद्दल रेल्वे मंत्री श्री. वैष्णव यांचे वैयक्तिक तसेच केआरपीएच्या वतीने आभार मानले आहेत.
००००
बी.सी.झंवर/विसंअ/