गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

चंद्रपूर, दि. १ : लाखो गुरूदेव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

अमरावती येथील गुरूकुंज आश्रम जगाच्या कानाकोपऱ्यातील गुरूदेव भक्तांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. थोर विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची येथे समाधी आहे. राष्ट्रसंतांनी राष्ट्रभक्ती, जागृती, अंधश्रद्धा-जातीभेद निर्मूलन, ग्रामविकास यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्याद्वारे लिखित ग्रामगिता अनेकांना जीवन कसे जगावे यासाठी प्रेरणा देते.

ग्रामविकास विभागाने २८ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महासमाधी स्थळ श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे.

०००