‘शिक्षण मित्र’ विद्यार्थी, शिक्षक, पालकांना देणार गतिमान सेवा

 Ø  वर्धा जिल्हा प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

 Ø  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची संकल्पना

 Ø  उपक्रमास लोकसेवा हक्क कायद्याची जोड

वर्धा, दि.७ (जिमाका) : विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत शिक्षण विभागाच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाने ‘शिक्षण मित्र’ नावाचा नाविन्यपुर्ण उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला लोकसेवा हमी कायद्याची जोड देण्यात आली असून विविध प्रकारच्या 20 सेवा या उपक्रमाद्वारे ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा वर्धा पहिलाच जिल्हा आहे. वने, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे न झिजवता शासकीय सेवा त्यांना कमी वेळेत आणि पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने लोकसेवा हमी कायदा आणला आहे. या कायद्यांतर्गत विविध सेवा कालमर्यादेत उपलब्ध करून दिल्या जातात. वर्धा जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून ‘शिक्षण मित्र’ नावाचा उपक्रम सुरु करून शिक्षण विभागाच्या 20 सेवा या कायद्यांतर्गत आणल्या. या सेवा कालमर्यादेत उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र पोर्टल देखील तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे विद्यार्थी, शिक्षक व पालकांना सेवा उपलब्ध होणार आहे.

या सेवांमध्ये खाजगी माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, मुख्य लिपीक व तत्सम पदावरील पदोन्नतीस मान्यता आदेश देणे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी नेमणूक, वैयक्तिक मान्यता आदेश देणे, स्वाक्षरीचे आर्थिक व प्रशासकीय अधिकार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदलीस मान्यता, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची विनाअनुदानित वरुन अनुदानित पदावर बदलीस मान्यता देणे.

खाजगी माध्यमिक शाळामधील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेत्तर समायोजन, खाजगी शाळांमधील अनुदान निर्धारण आदेश निर्गमित करणे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे 3 लक्ष पर्यंत वैद्यकीय प्रतीपूर्ती प्रस्ताव मंजूर करणे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी मंजुरी आदेश, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण देयक मंजूर करणे, विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेत बदल, दुरुस्ती, विद्यार्थी, त्यांचे वडील व आईच्या नावात बदल, विद्यार्थ्यांच्या जातीच्या नावात बदल मंजुरी आदेश या सेवांचा समावेश आहे.

सोबतच इयत्ता 10 वी व 12 चे गुणपत्रक, प्रमापत्रक मध्ये विद्यार्थी, वडील, आईच्या नावात व जन्मतारखेत बदल करण्याबाबत शिफारसपत्र मिळणे, खाजगी माध्यमिक शाळा खाते मान्यता वर्धित करणे, वेतनेत्तर अनुदान मंजुरी आदेश व वेतनेत्तर अनुदान वितरित करणे, खाजगी शाळा अनुदान टप्पा अनुदान वितरण आदेश निर्गमित करणे आदी सेवा या उपक्रमात घेण्यात आल्या आहे. यातील काही सेवा 15 दिवस तर काही सेवा 21 दिवसांमध्ये उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्याचे शिक्षणक्षेत्र गतिमान होईल – राहुल कर्डिले

लोकसेवा हमी कायद्यांतर्गत बऱ्याच सेवा ऑनलाईन करण्यात आल्या. यामुळे नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध होत आहे. शिक्षण विभागाचे कामकाज अधिक गतीमान झाले पाहिजे, यासाठी आपण जिल्ह्यात 20 प्रकारच्या सेवा या कायद्यांतर्गत आणल्या. ‘शिक्षण मित्र’ नावाचा स्वतंत्र उपक्रम सुरु केला. यासाठी वेगळे स्वतंत्र पोर्टल देखील सुरु करण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षक, पालकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्र गतिमान होण्यास मदत होणार आहे.

शुभारंभालाच अनुकंपा नियुक्तीचे पत्र

‘शिक्षण मित्र’ उपक्रमाचा शुभारंभ वने, सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते झाला. शुभारंभाप्रसंगीच अभिजित मधुकरराव देशमुख या युवकास उपक्रमाच्या पोर्टलद्वारे तातडीने कार्यवाही करून अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे पत्र श्री.मुनगंटीवार यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी दिवंगत शिक्षक मधुकरराव देशमुख यांच्या पत्नी भारती देशमुख उपस्थित होते.

 

०००