सातारा दि. ७ (जिमाका ): जिल्हा सांख्यिकी कार्यालयतर्फे जिल्ह्याचे नियमित शासकीय प्रकाशन ‘जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन- २०२३’ या पुस्तकाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले.
सातारा जिल्हा हा राज्यात सर्वप्रथम नाविन्यपूर्ण पद्धतीने ‘जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन – २०२३’ या पुस्तकाची मांडणी करणारा ठरला आहे. तसेच ‘कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष (EMDb)’ मध्ये सातारा जिल्हा हा विहित मुदतीत अचूक माहिती सादर करणारा राज्यात दुसरा आलेला आहे. याबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांख्यिकी कार्यालयाचे कौतुक केले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक डॉ. अपर्णा गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा सांख्यिकी कार्यालय, सातारा यांचेकडून प्रतिवर्षी जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन हे पुस्तक तयार करण्यात येते. या पुस्तकात जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागांची विविध प्रकारची सांख्यिकी माहिती अंतर्भूत असल्याने शासनाला राज्याचा व जिल्ह्याचा अर्थसंकल्प तयार करताना या पुस्तकाची विशेष मदत होते. नियोजन विभागा अंतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालानालायाकरिता अत्यंत अभिमानास्पद असे संख्याशास्त्रज्ञ प्रा.सी.आर. राव यांना यावर्षीचे संख्याशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले व याच वर्षी त्यांचे निधन झाले. सातारा जिल्ह्याचे सांख्यिकीय प्रकाशन ‘जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन – २०२३’ हे प्रा.सी.आर.राव यांस समर्पित असून त्यांच्या सांख्यिकी कार्यासंबंधीची माहिती देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या क्यू आर कोड चा वापर या पुस्तकात केला आहे.याची संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी विशेष प्रशंसा केली आहे.
सन २०२३ च्या प्रकाशनाकरिता व EMDb ची माहिती सर्व शासकीय व निमशासकीय विभाग प्रमुखांनी विहित वेळेत महिती अचूक पद्धतीने सादर केल्यामुळे प्रकाशन मुदतपूर्व करणे शक्य झाल्याबद्दल डॉ.गुरव यांनी सर्व विभागांचे आभार व्यक्त केले व यापुढेही अशाच पद्धतीने माहिती देण्याबाबत आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सादरीकरण उपसंचालक डॉ अपर्णा गुरव यांनी केले. या कार्यक्रमास पुणे विभागाचे उपआयुक्त (नियोजन विभाग), संजय कोलगणे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील आणि अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिपत्याखालील इतर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.