मराठी भाषा प्रेमींना एकत्र आणण्यासाठी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन – मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 9 : महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही मराठी भाषा जपणारे नागरिक आहेत. भाषा जिवंत ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना एकत्र येता यावे, या उद्देशाने विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ अशी या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

येत्या 27 ते 29 जानेवारी या कालावधीत नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र येथे विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने पूर्व तयारीचा मंत्री श्री.केसरकर यांनी आढावा घेतला. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. तत्पूर्वी झालेल्या आढावा बैठकीत विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उपसचिव हर्षवर्धन जाधव, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.श्यामकांत देवरे यांच्यासह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, विश्व मराठी संमेलनाचे आयोजन राज्य शासनामार्फत केल्याने त्यात सातत्य राहणार आहे. यापुढे दरवर्षी हे संमेलन आयोजित करण्यात येईल. केवळ परदेशातील नागरिकांसाठी हे संमेलन नसून महाराष्ट्रासह देशातील बृहन्महाराष्ट्र मंडळे तसेच परदेशातील विविध संस्थांच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी काम करणाऱ्यांना एकत्र येता यावे, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपक्रम राबविता यावेत, या उद्देशाने हे आयोजन होत आहे. यासाठी विविध संस्थांशी संपर्क साधण्यात येत असून देशाबाहेरील अमेरिका, युरोप, ब्राझील, जपान, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आदी देशांमधून सुमारे 500 तर भारतातील सुमारे एक हजारांहून अधिक मराठी भाषा प्रेमी नागरिक येण्याची अपेक्षा आहे.

विश्व मराठी संमेलनात विविध दर्जेदार उपक्रम आयोजित करण्यात येणार असून त्यात बोलीभाषा संवर्धनाच्या अनुषंगाने एक सत्र अंतर्भूत असेल, असेही मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/