पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेसाठी आता एक लाख रुपये अनुदान – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

0
44

मुंबई, दि. 10 : पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्यामुळे भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे असे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मंत्री  श्री. महाजन म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटूंबांना घरे उपलब्ध करुन देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य देण्यात येते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना राबविताना जागेची कमतरता – राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकरणामुळे जागा उपलब्ध होत नाही. पंडित दीनदयाळ जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य खरेदी योजनेंतर्गत प्रति लाभार्थी ५० हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते. मात्र, एवढ्या कमी अर्थसहाय्यामध्ये ग्रामीण भागात जागा उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत अनुज्ञेय अर्थसाहाय्यामध्ये मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व शुल्क इत्यादी शासकीय शुल्कांचा समावेश आहे, त्यामुळे प्रत्यक्षात जागा खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणारी अर्थसहाय्याची रक्कम कमी आहे. या पार्श्वभूमीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५०० चौरस फूटसाठी ही रक्कम मर्यादा ५० हजार रुपये वरून १ लाख रुपये केल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे.

******

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here