नांदेड जिल्ह्याला पर्यटनाच्या क्षेत्रात विकासाच्या मुबलक संधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

  •  २०० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी
  • शिर्डीच्या धर्तीवर व्हावा नांदेड चा विकास

नांदेड दि. १० (जिमाका) : नांदेड जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी दडलेल्या आहेत. येथील शिख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हुजूर साहिब सचखंड गुरुद्वारा, साडेतीन शक्ती पिठापैकी एक असलेले माहूर येथील रेणूका देवी मंदिर व दत्ताचे जागृत स्थान, विस्तीर्ण गोदावरी, महानगरानजीक असलेला विष्णुपूरी प्रकल्पाचा जलाशय आदी ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. राज्यातील शिर्डीच्या धर्तीवर नांदेड येथे विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असून विमानसेवा सुरु करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले.

नांदेड जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रमाणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीस नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड, नियोजन विभागाचे उपआयुक्त किरण गिरगावकर यांनी दूरदृष्यप्रमाणालीद्वारे तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व इतर विभागाचे अधिकारी यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा सचित्र आढावा सादर केला. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 च्‍या रु. 426.00 कोटीच्या प्रारूप आराखडा राज्यस्तरीय समितीस मान्यतेसाठी सादर केला. नांदेड जिल्ह्याची असलेली व्याप्ती, सोळा तालुके, दोन राज्याच्या असलेल्या सीमा लक्षात घेता विविध विभागाने विकास कामासाठी निधीची मागणी केली आहे. या विकास कामासाठी 200 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक विचार करु असे सांगितले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सचित्र सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

०००