केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम

राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन

मुंबई, दि. ११ :- केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. ‘महाराष्ट्रातील स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदानातून, आणि सफाई, स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे. स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हिरो असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी या यशामध्ये मोलाचे योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने ७ स्टार मानांकनासह तिसरा क्रमांक पटकावला आहे. एक लाखाहून कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये नगर परिषद सासवडला प्रथम आणि लोणावळा शहराला तृतीय क्रमांक मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेला ५ स्टार मानांकन आणि पिंपरी चिंचवडला ५ स्टार मानांकनासह वॉटरप्लस मानांकन मिळाले आहे. याशिवाय एक लाखाहून कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये सासवड, लोणावळ्यासह, कराड, पाचगणी व विटा यांनी स्वच्छ शहरांचे पुरस्कार पटकावले आहेत. तर गडहिंग्लज, विटा, देवळाली आणि सिल्लोड या शहरांनी मानांकनात स्थान मिळवले आहे. यामुळे देशातील पहिल्या दहा उत्कृष्ट स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ८ शहरांनी स्थान मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘महास्वच्छता’ अभियानाची सुरुवात झाली आहे, त्यापूर्वी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरु झालेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेने मुंबईचे रस्ते, गल्ल्या स्वच्छ होऊ लागल्या आहेत. स्वच्छता कामगारांच्या बरोबरीने जनता या स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होत असून या चळवळीला आता लोकचळवळीचे स्वरुप आले आहे.

मुंबईपासून सुरु झालेली ही मोहिम आता राज्यभर राबविण्यात येत असतानाच आज महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व अधिकारी-कर्मचारी अधिक जोमाने, उत्साहाने या स्वच्छता मोहिमेत सहभागी होतील. यापुढेही आपण स्वच्छतेच्या अभियानात असेच सातत्य राखूया असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुरस्कार आणि मानांकन प्राप्त शहरांचेही अभिनंदन केले आहे.

0000