गंगापूर उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन

0
9

प्रत्येक फिडर सौर ऊर्जेशी जोडून शेतीला विजपुरवठा

छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)-   मराठवाड्याशी निगडीत ‘दुष्काळी’ अशी ओळख मिटविण्यासाठी शासनाने  एकात्मिक जलआराखडा तयार करुन नियोजन केले आहे. त्याद्वारे मराठवाडा जलसमृद्ध करुन नंतर पीक पद्धतीत बदल व नैसर्गिक शेतीला चालना देऊन शेती विषमुक्त करण्याचा संकल्प, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

गंगापूर उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आरापूर ता. गंगापूर येथे करण्यात आले. यानिमित्त आयोजित जाहीर सभेत श्री. फडणवीस बोलत होते.  केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, आ. रमेश बोरनारे, आ. प्रशांत बंब, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, बजाज फाऊंडेशनचे  सी.पी. त्रिपाठी तसेच अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गंगापूर भागातील ४० गावांमधील ३० हजार एकर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे भुमिपूजन श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. भुमिपूजन स्थळी  विधीवत पूजा करुन व कुदळ मारुन प्रारंभ करण्यात आला. तसेच कोनशीला अनावरणही करण्यात आले. उपस्थित अभियंत्यांकडून श्री. फडणवीस यांनी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.

आपल्या भाषणात श्री. फडणवीस म्हणाले की, ‘जय जवान जय किसान’, हा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी आहे. त्याच दिवशी ‘जय किसान’ हा नारा सार्थ करणारा कार्यक्रम होत आहे. गंगापूर भागात पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी असे प्रश्न होते. मी स्वतः ३० जून २०२३ ला येथे आलो होतो. त्यावेळी जलजीवनचे भुमिपूजन करण्यासाठी आलो होतो. तेव्हाच या योजनेच्या मंजूरीची प्रत आणली होती.  आज या योजनेचे भुमिपूजन करतांना  मला आनंद होत आहे. सर्व क्षेत्राला ठिबकद्वारे थेट शेतात पाणी देणारी ही एक अभिनव योजना आहे. ते पुढे म्हणाले की, मराठवाड्याची दुष्काळी ही ओळख मिटविण्यासाठी  शासनाचे प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी एकात्मिक जलआराखडा तयार करण्यात आला. त्यावरुन योजना तयार केली. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी शासनाने १८ हजार ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. ५००० कोटी सिंचनासठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जे कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्यात आणण्यासाठी  ११ हजार कोटी रुपयांचे कामे केली जात आहेत.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प अशा प्रकल्पांना चालना देऊन  सिंचनासाठी भरीव तरतूद केली आहे. मराठवाड्यातील ३१ हजार ७५१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन  ४ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची तरतूद झाली आहे,असे त्यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, सिंचनासाठी लागणारी संपूर्ण वीज दिवसा देण्यासाठी प्रत्येक फिडर सौर उर्जेद्वारे जोडण्याचे नियोजन आहे. शेतीला पाणी दिल्यानंतर पीक पद्धतीत बदल करुन विषमुक्त शेती करण्याचे शासनाचे धोरण आहे. कृषी प्रक्रिया उद्योगांद्वारे या भागात रोजगार निर्मितीला चालना मिळेल. महिलांसाठी शासनाने नवीन महिला धोरण आणले आहे. आमच्या भगिनी सरासरी एका वर्षाच्या कालावधीत अडीच महिने कालावधी केवळ पाणी भरण्यात घालवतात. त्यांची या त्रासातून सुटका करुन त्यांच्या वेळेचा सदुपयोग रोजगार, व्यवसायात करावयाचा आहे. मुलीचा जन्म झाल्यावर ‘लेक लाडकी’, या योजनेद्वारे त्या कुटुंबाला  मुलीच्या १८ व्या वर्षी १ लाख रुपये देण्यात येणार आहेत. महिलांच्या रोजगार, स्वयंरोजगारासाठी शासन सहाय्य करणार आहे,असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कामगार कल्याण पेटी, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना,  उज्ज्वला गॅस योजना,  महिला आरोग्य पेटी, दिव्यांगांना साहित्य, क्रीडा साहित्य असे लाभ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी  आपल्या भाषणात सांगितले की, जलजीवन मिशन सारख्या योजनेतून प्रत्येक गावात पाणी पोहोचत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून  अनेक योजना गावोगावी पोहोचत आहेत. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकातून  आ. प्रशांत बंब गंगापूर उपसा सिंचन योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीताने सांगता.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here