जगाला हेवा वाटेल असा विकसित महाराष्ट्र घडविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
13

पालघर दि. १३ : राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देऊन राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे.   जगाला हेवा वाटावा  असा विकसित महाराष्ट्र  घडवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वि.वा. ठाकूर महाविद्यालय, विरार येथे १९ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री.  शिंदे बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार सर्वश्री हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, वसई – विरार महापालिकेचे आयुक्त अनिल पवार, संमेलनाचे अध्यक्ष, जपान मधील मराठी आमदार योगेंद्र पुराणिक, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त जगामध्ये कुठेही मराठी माणूस स्थायिक झाला तरी त्यांची नाळ ही मराठी भाषा व महाराष्ट्राशी जोडलेली असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपानमधील मराठी भाषिक आमदार योगेंद्र पुराणिक हे आहेत. काळाबरोबर अनेक शब्दांचा संचय मराठी भाषेमध्ये झाला आहे. शेकडो वर्षांपासून मराठी भाषेची मुळं सामान्य जनतेच्या मनामध्ये घट्ट रुजलेली आहेत हे सर्वांना अभिमानास्पद आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण  झालेला शिवडी – नाव्हा शेवा ट्रान्स हार्बर लिंक हा पर्यावरणपूरक प्रकल्प असून तो वरळी, कोस्टल हायवे, मुंबई – पुणे एक्सप्रेस वे, मुंबई -गोवा हायवे, तसेच वसई – विरार- अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर या मार्गाला जोडण्यात येणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मुंबई -पुणे मीसिंग लिंक हा जगातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा तयार होत आहे. या बोगद्यामुळे पुण्याचे अंतर हे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. वर्सोवा सी ब्रिजची जोडणी पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत वाढविण्यात  आली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र संत, साहित्यिक, कवी, कलाकारांची भूमी असून या सर्व महान विभूतींनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. यामुळेच आपली मराठी भाषा भक्कम पायावर उभी असून  जगभर मराठी भाषेचा प्रसार होतांना आपल्याला दिसत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने पहिले विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते या संमेलनाला  जगभरातील मराठी बंधू-भगिनीचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी देखील विश्व मराठी साहित्य संमेलन, वाशी येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामुळे मराठी भाषेचा प्रसार जगभर होण्यास मदत होणार आहे . गिरगाव चौपाटी येथे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here