वाढीव पदांवर समायोजन झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत – मंत्री दीपक केसरकर

0
8

मुंबई, दि. १३ :  वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ समायोजनास पात्र शिक्षकांपैकी मुंबई विभागातील २० शिक्षकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते यासंदर्भातील आदेश प्रदान करण्यात आले. वाढीव पदावर समायोजन केलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईत नुकताच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

मान्यताप्राप्त खासगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढल्यामुळे वाढलेल्या अतिरिक्त कार्यभारानुसार पायाभूत पदांपेक्षा अतिरिक्त शिक्षक पदे मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले होते. सन २००३-०४ पासून २०१८-१९ पर्यंत वाढीव कार्यभारानुसार अतिरिक्त वाढीव पदे मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता. या कालावधीतील वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी समायोजन झालेल्या शिक्षकांना यावेळी शुभेच्छा दिल्या. समायोजनाचे आदेश प्राप्त शिक्षकांनीही शासनाच्या या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त करून आभार मानले. यावेळी संबंधित सर्व शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here