शास्त्रीय संगीतातील स्वरप्रभा निमाली– महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. १३ :  आपल्या प्रतिभासंपन्न गायनाने भारतीय संगीतक्षेत्र समृद्ध केले, अशी शास्त्रीय संगीतातील स्वर प्रभा निमाली, अशा भावना व्यक्त करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित अशा डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन ही राज्याच्याच नाहीतर देशाच्या कला व संगीत सृष्टीची फार मोठी हानी असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.

भारतीय शास्त्रीय संगीतसृष्टीतील प्रभा युगाचा अंत झाला असून ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या जाण्याने कला, साहित्य, संगीत आदी विविधांगी क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारे एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व हरपले आहे. तब्बल ११ पुस्तके तसेच ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीतून त्यांनी गानरसिकांच्या मनावर अधिराज्य केले. अशा सृजनशील, अलौकीक प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्वास मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मंत्री विखे पाटील म्हटले आहे.

०००