राज्याला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी प्रयत्नशील – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मिशन लक्ष्यवेधयोजना; बक्षिसांची रक्कम वाढविली

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी राज्य क्रीडा दिवस

क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न

लातूर, दि. १६ (जिमाका): ऑलिम्पिकमध्ये देशाला पाहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव आणि स्मरण करून राज्यात विविध खेळाविषयी जनजागृती करण्याचा उद्देश आहे. यासोबतच राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात राज्य अग्रेसर बनावे, यासाठी क्रीडा विभागामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

पहिल्या राज्य क्रीडा दिनानिमित्त सोमवारी उदगीर येथील तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव आणि मंत्री चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घानप्रसंगी मंत्री श्री. बनसोडे बोलत होते. माजी आमदार गोविंद केंद्रे, व्यंकटराव बेंद्रे, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार प्राप्त गणपतराव माने, पंडित धुमाळ, सिध्देश्वर पाटील, दत्ता पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शेख फैयाज, अहेमद सरोवर, शेख इफ्तेखार यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य शासनाने खेळाडूंसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. गत तीन वर्षांपासून रखडलेल्या शिवछत्रपती राज्य पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंना 3 लाख ऐवजी 5 लाख रुपये आणि अन्य पुरस्कार विजेत्यांना 1 लाख ऐवजी 3 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, खेळाडूंना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा आणि गुणवत्ता वाढीसाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेंतर्गत प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

उदगीर येथे होणार खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

उदगीरला खेळाची मोठी आणि खूप जुनी परंपरा असून ही परंपरा जोपासण्यासाठी उदगीर येथे राज्याच्या क्रीडा विभागामार्फत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. नुकताच राज्यस्तरीय युवा महोत्सव शहरात पार पडला. तसेच विविध क्रीडा स्पर्धाही झाल्या. आता लवकरच खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीरमध्ये आयोजित केली जाणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

मंत्री चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

राज्य क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि उदगीर येथील नामदार संजय बनसोडे क्रीडा मंडळाच्या वतीने उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या मंत्री चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन मंत्री श्री. बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्य क्रीडा दिनानिमित्त रुस्तम- ए- हिंद, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त हरिश्चंद्र बिराजदार यांच्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील जन्मस्थळावरून उदगीर तालुका क्रीडा संकुल पर्यंत क्रीडा ज्योत आणण्यात आली. उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे ही ज्योत मंत्री श्री. बनसोडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

पहिल्या राज्य क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत क्रीडा विषयक मार्गदर्शन शिबीर, क्रीडा विषयक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांची माहिती देण्यात आली. उदगीर शहरातील विद्यार्थ्यांचा या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

जिल्हा क्रीडा संकुल येथे ‘खेलो इंडिया’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी यावेळी दाखविलेल्या कुस्ती आणि जिमॅस्टिकच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची दाद मिळविली.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त गणपतराव माने आणि दत्ता गलाले, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आकाश बनसोडे, आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू ज्योती पवार, रायफल नेमबाज जागृती चंदनकेरे, थायबॉक्सिंग खेळाडू अबू सुलेमान यांच्यासह अन्य खेळाडूंचा यावेळी सन्मान करण्यात आला.

माजी आमदार गोविंद केंद्रे, व्यंकटराव बेंद्रे, दत्ता पाटील, शेख फैयाज, अहेमद सरोवर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा केंद्रे, संतोष कोले यांनी केले.

०००