मुंबई, दि. १६ :- महाराष्ट्रात फुलांची वैविध्यता आणि विपुलता असल्यामुळे मध माशापालनाला मोठा वाव आहे. त्यामुळे मध उद्योगाची व्याप्ती वाढविण्यासाठी मधमाशी पालनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिला मध महोत्सव २०२४ खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने १८ व १९ जानेवारीला आयोजित केला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले.
मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात श्री. साठे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मधमाशी ही केवळ मध व मेण एवढ्या पुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करते. मधमाशा हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाची जोडलेला आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविते. यामध्ये प्रामुख्याने मध केंद्र योजना तसेच मधाचे गाव या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मधमाशापालनातील उपउत्पादने जसे पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलीस, मधमाशांचे विष इत्यादी उत्पादनांची माहिती, मधमाशा पालन उद्योगाचे प्रदर्शन या महोत्सवात करण्यात येत आहे. त्यामुळे मधा बरोबर मध, मेण यापासून तयार करण्यात आलेले उपउत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधपाळांचे किमान 20 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या मध महोत्सवात मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य, मधाचे व मधमाशांचे विविध प्रकार, व मधापासुन तयार होणारी विविध उत्पादने, तसेच सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मधापासुन विविध पाककृतीचे प्रात्यक्षिक दुपारी 12.30 वाजता आकर्षणाचे केंद्र असणार आहे.
मध महोत्सवाच्या माध्यमातून मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ आणि मध, मधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यात १८ जानेवारीला शेती व मधमाशा पालन, गुणवत्तापूर्ण मध आणि मुल्यवर्धित उत्पादने, १९ जानेवारीला मध व आरोग्य, मधुक्रांतीसाठी महाराष्ट्राचे पाऊल या विषयांवर परिसंवाद होणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाचा ‘मधुबन’ हा मधाचा ब्रॅंड आहे. हे दर्जेदार मध २० टक्के सवलतीच्या दराने नागरिकांना येथे उपलब्ध असणार आहे असेही श्री. साठे म्हणाले.
महाराष्ट्र हे भारतातील मधाचा सर्वात जास्त हमीभाव, प्रति किलो पाचशे रुपये, देणारे राज्य आहे. त्याचबरोबर मधपाळांची माहिती संकलन करण्याची योजना सुद्धा राबविण्यात येणार आहे. राज्यात १० गावांची निवड मधाचे गाव यासाठी करण्यात आलेली आहे. डोंगराळ भाग, मध हा पारंपरिक व्यवसाय असणे आणि फुलोरा या निकषांवर गावांची निवड करण्यात आली आहे. या गावात प्रशिक्षण व जनजागृती करण्यासाठी प्रत्येकी ५० लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शिवाय मधमाशीचे विष हे दुर्धर आजारावर सुद्धा उपयुक्त आहे याची माहिती लोकांना नाही. त्यामुळे मधमाशांचे विष काढण्याचा भविष्यातील ड्रिम प्रोजेक्ट सुरु करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पहिल्यांदाच न बघितलेले, न अनुभवलेले मधाचे वैविध्यपूर्ण जग या महोत्सवाच्या माध्यमातुन लोकांना अनुभवता येणार आहे.
राज्यात मधमाशांच्या ५ जाती आहेत. सातेरी, मेरीफेरा, आग्या, फ्लोरिया आणि पोया. यातील सातेरी आणि मेरीफेरा ह्या अंधारात राहणाऱ्या आणि पाळीव मधमाशा आहेत. या मधमाशांची शेती उत्पादन वाढण्यासाठी मदत होते. याच मधमाशीचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. महाबळेश्वर आणि पश्चिम घाटातील १२ जिल्हे आणि ६३ तालुक्यात सातेरी मधमाशी सापडते.
कोकणात पोयाच्या छोट्या मधमाशांचे अस्तित्व आढळते, विदर्भात सातेरी तर मराठवाड्यात मेरिफेरा या मधमाशीचे जतन करतात. सूर्यफुल, ओवा, जांभुळ, आग्या माशांचे मध असे विविध प्रकारचे मध या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे अशी माहिती मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी दिली.
यावेळी महाबळेश्वर येथील मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील उपस्थित होते.
००००
मनीषा सावळे/विसंअ/