मुंबई, दि. 18 : पाणीपुरवठ्याबाबत जल सुरक्षित करण्याच्या व शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने अमृत 2.0 अभियानांतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीपुरवठा आणि प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, सातारा, शेगाव व भद्रावती या शहरात हाती घ्यावयाच्या पाणीपुरवठा, तर सांगली शहरातील मलनिःसारण प्रकल्पांचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 1,201 कोटी रुपये किंमतीच्या या प्रकल्पांमुळे या शहरांतील नागरिकांना शुद्ध पाण्याचा शाश्वत पुरवठा तसेच मलनि:स्सारण सुविधा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचे (पीएमस्वनिधी) प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात येईल.
अमृत 2.0 अभियान
देशातील शहरे पाणीपुरवठ्याबाबत जल सुरक्षित करण्याच्या व शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने सन 2015 मध्ये अमृत अभियान सुरू केले आहे. 2021 पासून अमृत 2.0 अभियान या नावाने हे अभियान अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. अमृत 2.0 अभियानातील प्रकल्पांची कामे सन 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.
या अभियानात राज्यातील 145 शहरांचे 28315 कोटी रुपये किंमतीचे 312 प्रकल्प केंद्र शासनाने मंजूर केले आहेत. या अभियानातून 41.47 लाख इमारतींना नळ जोडणीद्वारे शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार असून 38.69 लाख इमारतींना मलनिःसारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानातून शहरातील सरोवर पुनरुज्जीवन आणि उद्यान विकासाचे प्रकल्प देखील राबविले जाणार असून त्याचा या शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे.
भूमिपूजन करण्यात येणाऱ्या सात शहरांतील प्रकल्पांपैकी भिवंडी-निजामपूर येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 426.04 कोटी रूपये इतका असून या माध्यमातून 84 हजार 500 नवीन नळ जोडणीद्वारे एक लाख 77 हजार 087 घरांना लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता 143 एमएलडी इतकी आहे. शेगाव येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 161.97 कोटी रूपये असून या प्रकल्पाच्या माध्यमातून 2662 हून अधिक नवीन जोडण्यांद्वारे 12 हजार 920 घरांना लाभ मिळू शकणार आहे. या प्रकल्पात पाणी प्रक्रिया क्षमता 11 एमएलडीने वाढून 34.89 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येईल.
उल्हासनगर येथील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून 40 हजार 709 नवीन नळ जोडण्यांद्वारे 46 हजार 840 घरांना लाभ दिला जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 126.58 कोटी रुपये अपेक्षित आहे. सातारा येथील पाणीपुरवठा प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता 15 एमएलडीने वाढणार असून 7328 नवीन जोडण्यांद्वारे 50 हजार 454 घरांना लाभ मिळणार आहे. या प्रकल्पासाठी 102.56 कोटी रूपये इतका खर्च येणार आहे. कल्याण-डोंबिवली येथील 77.58 कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून एक हजार नवीन नळ जोडण्या दिल्या जाणार असून याचा लाभ 12 हजार 100 घरांना मिळणार आहे. तर, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पाणीपुरवठा प्रकल्पात 5980 नवीन पाणी जोडण्यांद्वारे 7314 घरांना लाभ मिळेल. या प्रकल्पाची पाणी प्रक्रिया क्षमता 7.79 एमएलडीने वाढणार असून या प्रकल्पाचा खर्च 52.87 कोटी रूपये इतका अपेक्षित आहे.
सांगली येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 253.41 कोटी रूपये इतका असून 41 हजार 277 नवीन जोडण्यांद्वारे एक लाख चार हजार 172 घरांना त्याचा लाभ होईल. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता 59 एमएलडीने वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
पीएम स्व – निधी योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण
कोविड 19 च्या प्रादुर्भावानंतर पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी पीएम स्व-निधी योजना अंमलात आणली. राज्यात 17 जून 2020 पासून या केंद्र पुरस्कृत योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने राज्याला दिलेले सहा लाख 60 हजारांचे उद्दिष्ट नोव्हेंबर अखेर पूर्ण झाल्याने केंद्राने 22 नोव्हेंबर 2023 रोजी सुधारित उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार या योजनेच्या सोलापूर शहरातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे.
बी.सी.झंवर/विसंअ/
०००
प्रधानमंत्रीचा १९ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा
२,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
नवी दिल्ली 18 : महाराष्ट्रातील सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 8 अमृत (कायाकल्प आणि शहरी परिवर्तनासाठी अटल मिशन) प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री सोलापूर शहरातील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील .
प्रधानमंत्री महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत पूर्ण झालेल्या 90,000 हून अधिक घरांचे लोकार्पण करतील. यासोबत, ते सोलापूरमधील रे-नगर गृहनिर्माण संस्थेच्या 15,000 घरांचे लोकार्पण करणार आहेत, या लोकार्पण कार्याक्रमात लाभार्थी असलेले हजारो हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, कचरा वेचणारे, विडी कामगार, चालक आदिंचा समावेश आहे. याशिवाय पंतप्रधान कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील पीएम -स्वनिधी च्या 10,000 लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यांचे वितरण करतील.
००००
अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 14 /दि. 18.01.2024