जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षण ही सर्वांची जबाबदारी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्य जैवविविधता मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

मुंबई, दि. 18 : जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र हे जैवविविधतेने नटलेले राज्य आहे. येथील जैवविविधता दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या राज्यातील जैवविविधता दर्शवणाऱ्या राज्यातील मानचिन्हांसह वन्यप्राणी, पक्षी, फुले यांच्या छायाचित्रांनी सजलेल्या सन 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ बी.एस. हुडा, मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर, उपसचिव विवेक होशिंग, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पाच्या (विशेष कक्ष) संचालक डॉ. विनिता व्यास, उपसचिव सिद्धेश सावर्डेकर आणि भगवान सावंत यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दिनदर्शिकेत आंबा, जारुळ, शेकरु, हरियाल, नीलवंत, पांढरी चिप्पी आणि पापलेट ही मानचिन्हे छापण्यात आली आहेत. याशिवाय राज्यातील रामसर स्थळे आणि तेथे आढळणारे मोठा रोहित. मोर शराटी, रंगीत कारकोचा, पाणचिरा, पट्ट कदंब हंस, चक्रवाक यांची छायाचित्रे विशेष लक्ष वेधून घेतात. नांदूर मध्यमेश्वर, लोणार सरोवर. ठाणे खाडी येथील छायाचित्रे या दिनदर्शिकेत वापरण्यात आली आहेत.

विविध प्रजातींची फुलपाखरे, वाघ, बिबट्या सारखे प्राणी, विविध प्रजातींचे पक्षी, ठोसेघर, लिंगमळा येथील धबधबे, पश्चिम घाटात आढळणाऱ्या स्थानिक वनस्पती व प्रजाती, कास पठारावरील निसर्ग वैविध्य, सरपटणारे प्राणी, विविध ठिकाणची जैवविविधता वारसा स्थळे आदींच्या छायाचित्रांच्या समावेशाने ही दिनदर्शिका अधिक आकर्षक बनली आहे. याविषयी अधिक माहिती दिनदर्शिकेत दिलेल्या क्युआर कोड स्कॅन करुनही पाहता येणार आहे. प्रत्येक महिनानिहाय वन, पर्यावरण, जैवविविधता आदी बाबींशी निगडीत असणाऱ्या दिवसांची नोंदही आवर्जून दिनदर्शिकेमध्ये घेण्यात आली आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/