मराठी भाषा, संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी ग्रंथ प्रदर्शन – सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार

0
11

नवी दिल्ली, १९ : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी केले.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे पुस्तक विक्री प्रदर्शन उद्घाटनाप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. अडपावार बोलत होते.  ते म्हणाले की, मराठी भाषेचा राजधानीत प्रचार व प्रसार व्हावा, तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यासारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राजधानीत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.      महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महाराष्ट्र सदन येथे ग्रंथ विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम, स्मिता शेलार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी आणि सदनातील अभ्यागत उपस्थित होते.

मराठी भाषा संवर्धन हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नाही तर एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ग्रंथ प्रदर्शन हे अभिनव आणि उपयुक्त उपक्रम असल्याचे सांगून डॉ.अडपावार पुढे म्हणाले, यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

या ग्रंथ प्रदर्शनात रसिक साहित्य प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, डायमंड बुक्स, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट आणि भारतीय साहित्य कला प्रकाशन दालने आहेत. साहित्य, संस्कृती, अर्थविषयक, राजकीय, ऐतिहासिक, वैचारिक अशा विविध विषयांवर आधारित सुप्रसिद्ध लेखकांसह, नवोदित लेखकांची  पुस्तके मांडण्यात आली आहेत. पुढील दोन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे ग्रंथ विक्री प्रदर्शन सुरु राहणार आहे. राजधानीतील मराठी लोकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सदन आणि परिचय केंद्राकडून करण्यात येत आहे. याठिकाणी परिचय केंद्राच्या वतीने ‘लोकराज्य’ मासिकाचे दालनही मांडण्यात आले  आहे.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दर्शनीय परिसरात मराठीमध्ये़ सुविचार लिहिले जात आहेत.

ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. अडपावार यांचे स्वागत उपसंचालक श्रीमती अरोरा यांनी रोपटे देऊन केले. यावेळी सर्व सहभागी प्रकाशकांना रोपटे भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here