उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अक्कलकोट येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन

सोलापूर/अक्कलकोट, दिनांक 19(जिमाका) :- राज्य शासनाकडून अक्कलकोट येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या जिर्णोद्वार कामासाठी 2 कोटींचा निधी तर नवीन बस स्थानकाच्या विकासासाठी 29 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, सर्वश्री आमदार सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, सुभाष देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवानंद पाटील, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक विनोद भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी श्री. पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

अक्कलकोट शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराचे काम 18 महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देवस्थान समितीने ठेवले आहे. मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे दक्षिणात्य शैलीचे असणार आहे. यासाठी राज्याच्या पर्यटन विकास विभागाकडून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या अंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित 2 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. या मंदिराचे पूर्ण बांधकाम रेखीव दगडातून केले जाणार आहे.

अक्कलकोट येथील नूतन बस स्थानकासाठी 29 कोटी रुपये निधी मंजूर असून एसटी बसने श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी व नागरिकांसाठी बसस्थानकात सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, सुसज्ज प्लॅटफॉर्म, आसन व्यवस्था, हिरकणी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

0000000