प्रत्येक गावाचा घरानिहाय डेटा तयार करावा; प्रत्येक कुटुंबाला शासकीय योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

0
6

नंदुरबार, दिनांक 19 जानेवारी 2023 (जिमाका वृत्त) – जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामसेवकाने गावनिहाय व घरनिहाय योजनांच्या अंमलबजावणीचा डेटा तयार करावा. तसेच येणाऱ्या दोन वर्षात गावातील प्रत्येक घरात शासकीय योजनांची लाभ पोहचवण्याचे नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात ग्रामविकास विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणी बाबत आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण सभापती संगिता गावित, कृषि व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, परिविक्षाधिन सनदी अधिकारी तथा नवापूर तहसिलदार अंजली शर्मा, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (नंदुरबार) चंद्रकांत पवार, गट विकास अधिकारी देविदास देवरे (नवापूर) आर.डी. घोरपडे (शहादा) व ग्रामसेवक संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी त्यावर वेळेत कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्यासाठी कुठल्याही योजनेचा निधी वेळेत खर्च होण्याबरोबरच तो व्यपगत होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. जिल्ह्यात शबरी घरकुल योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे उद्दिष्ट नसल्याने पात्र असणाऱ्या सर्व अर्जदारांना या योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही याची काळजी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी घ्यावी. सरकारने आखलेल्या सर्व योजना जिल्ह्यातील नागरिकांना 2 वर्षात मिळतील यासाठीचे नियोजन करण्यात यावे.

जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी जलजीवन मिशनच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता व कामांचे आदेश त्वरित देण्याची कार्यवाही करावी. कामाचे आदेश वितरीत होवूनही ज्या ठेकेदारांमार्फत काम सुरू झालेले नाही, अशा ठेकेदारांना काळ्या यादीत का टाकू नये? याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात याव्यात. पिण्याचे पाणी ही अत्यावश्यक बाब असल्याने या कामात कुठलीही दिरंगाई हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जलजीवन मिशनमध्ये ज्या गावांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली आहे, तेथे तात्काळ नळ कनेक्शन देवून पाणीपुरवठा सुरू करावा. 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून नळ जोडणीसाठी आलेला निधी इतर कामांसाठी खर्च झाला असल्यास तेथे अधिग्राममधून निधी देण्यात येईल.

टंचाईच्या कामांबाबत बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले,  संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय करुन कामे मार्गी लावावीत. मार्च अखेरपर्यत सर्व कामे होणे अपेक्षित आहे. सर्व गावातील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासोबतच ज्या गांवे-पाडे यांना जोडणारे रस्ते नसतील अशा रस्त्यांची यादी तयार करुन त्वरीत सादर करावी. वर्ष  2024-25 पर्यंत सर्व गांवे-पाडे 100 टक्के रस्त्यांनी जोडली गेली पाहिजेत व ते बारमाही झालेले पाहिजेत. सर्व लोकांपर्यंत त्यांच्या मुलभूत गरजांच्या योजना पोहचल्या पाहिजेत. गावातील स्थलांतर रोखण्यासाठी बचत गट स्थापन करून, उद्योग उभारणीची कामे गावांतच उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील एकही व्यक्ती स्थलांतरीत होणार नाही याची काळजी सर्व यंत्रणांनी घ्यावी.  ग्रामसेवकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गांवातील अडचणी, त्रुटींबाबातची माहिती सादर करावी. सर्व ग्रामसेवकांनी त्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील  प्रत्येक घरांची संपर्ण तपशिलवार माहिती संकलीत ठेवावी.  जेणे करुन कोणत्या योजना दिल्या कोणत्या बाकी आहेत याची माहिती त्वरीत उपलब्ध होऊ शकेल.

 

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here