मराठा समाज ‘मिशन सर्वेक्षण’ मोहीम युध्द पातळीवर – महसूलमंत्री विखे पाटील

मुंबई, दि. २० :  महसूल विभागाच्या माध्यमातून मराठा समाज ‘मिशन सर्वेक्षण’ मोहीम राज्यात युध्द पातळीवर राबिण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यानी आज केले. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यातील कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात संदर्भात सर्वेक्षण करण्याच्या अनुषंगाने पुणे येथे गोखले इन्स्टीट्युटमध्ये मास्टर ट्रेनर्संना प्रशिक्षण कार्यक्रमास शुक्रवार पासून प्रारंभ झाला. याची माहिती मंत्री श्री. विखे पाटील यांनी माध्यमांना दिली.

पुणे येथे गोखले इन्स्टीट्युटमध्ये प्रशिक्षित मास्टर ट्रेनर्स हे जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर संबंधित प्रगणक (इन्म्युरेटर) यांना दिनांक 21 व 22 जानेवारी, 2024 या दोन दिवसात प्रशिक्षण देणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची दृकश्राव्य माध्यम प्रणालीद्वारे महत्वाची बैठक घेण्यात आली.

हे प्रशिक्षण प्रभावीपणे पार पडावे यासाठी सदर प्रशिक्षणार्थी हे एका बॅचमध्ये 75 पेक्षा जास्त नसतील. सर्वेच्या अनुषंगाने जिल्हा/तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना डॅशबोर्ड देण्यात येईल. त्यामध्ये सर्वेक्षणाची सर्व माहिती उपलब्ध असणार आहे. त्याआधारे या सर्वेक्षणाच्या प्रगतीची अद्ययावत माहिती / अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगास उपलब्ध होणार आहे. तद्नंतर सर्वेक्षणाचे प्रत्यक्ष काम हे दिनांक 23.1.2024 ते 31.1.2024 या कालावधीत युध्द पातळीवर होणार आहे.  या कामासाठी महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था, नगर विकास संस्था, शिक्षण विभागाचे सर्व क्षेत्रीय कर्मचारी कार्यरत राहतील.

सर्वेक्षण करताना ऑनलाईन माहिती भरत असताना खुल्या प्रवर्गाचा व्यक्ती असेल तर 121 प्रश्न संच असलेला फॉरमॅट आवश्यक माहिती भरण्यासाठी कार्यरत होईल. सदर सर्वेक्षणाची माहिती भरताना ती चार भागामध्ये पुढीलप्रमाणे असणार आहे. पहिल्या भागात संबंधित व्यक्तीची मुलभूत माहिती जसे- आधार कार्ड, पॅनकार्ड इ., दुसऱ्या भागात संबंधित व्यक्तीची सामाजिक माहिती, तिसऱ्या भागात संबंधित व्यक्तीची शैक्षणिक माहिती व चौथ्या भागात संबंधित व्यक्तीची आर्थिक माहिती असणार आहे. याप्रमाणे 121 प्रश्नसंचाची माहिती पूर्ण भरल्यानंतर सिस्टीमवर कॅमेरा ऑन होवून संबंधित व्यक्तीचा फोटो व स्वाक्षरी घेण्यात येवून त्याची ही माहिती संगणक प्रणालीवर जमा होणार आहे.

कुणबी , मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संदर्भात आढळुन आलेल्या नोंदीच्या आधारे संबधित पात्र व्यक्तींना कुणबी,मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा‍धिकारी यांच्या स्तरावर जिल्हयात शिबिरांचे आयोजन करुन पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र तातडीने निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

तसेच ज्यांच्या कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत, त्या संबधित नागरिकांना निदर्शनास येण्याच्या अनुषंगाने त्यांच्या याद्या सर्व तलाठी यांच्या मार्फत गाव स्तरावर मोहिम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, जेणेकरून पात्र नागरीकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरता सदर नोंदी या पुरावा म्हणून सादर करता येतील. युध्दपातळीवर होणाऱ्या सर्वेक्षणाच्या प्रगतीवर आपण स्वत: लक्ष ठेवून असणार असल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

0000