विभागीय आयुक्तांकडून लोणार विकास आराखड्यांतील विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी

अमरावती, दि. २१ : लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेली कामे प्रगतीपथावर असून  आराखड्यातील उर्वरित कामे नियोजित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.  निधी पाण्डेय यांनी दिले.

लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेल्या कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी व विकासकामांच्या प्रगतीचा आढावा डॉ. पाण्डेय यांनी शनिवारी (ता.२० जानेवारी) लोणार येथे घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, समितीचे सदस्य तथा न्यायालयीन मित्र ॲड. एस. सान्याल, ॲड. दिपक ठाकरे, ॲड. कप्तान, ॲड. परचुरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, वनविभाग, नगरपरिषद, एमएमआरडीएचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, बुलडाणा जिल्ह्यातील बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगविख्यात आहे. हे स्थळ जैवविविधतेने सपन्न असून पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन व विकास तसेच परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाव्दारे 369 कोटी 78 लक्ष रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी समितीव्दारे नियमितपणे आढावा घेण्यात येतो. आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद उपब्धत करुन देण्यात आली आहे. त्यानुसार आरखड्यातील विकासकामे गतीने पूर्ण होण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. विकास आराखड्यांतर्गत येणारी लोणार सरोवर व परिसरातील नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

सरोवराचे पाणी व जैवविविधतेसंबधी संशोधन करण्यासाठी संशोधकांना नवीन संधी व दिशा उपलब्ध आहेत. यासाठी शासनाद्वारे वैज्ञानिक सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली असून त्याअनुषंगाने नवीनतम संशोधनाला गती देण्यात यावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी केल्या.

विकास आराखड्यांतर्गत भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या १५ मंदिरांचे जतन, संरक्षण व सुशोभिकरण व दुरुस्तीची कामे टप्प्या टप्प्याने सुरु आहेत. त्या कामांना गती देवून ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात यावे, असे निर्देश समिती सदस्यांनी यावेळी दिले.

सरोवर परिसरातील ‘ईको टुरिझम’चे काम पूर्णत्वास जाण्यासाठी वनविभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे. लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांची उभारण्याची कामे गतीने पूर्ण करण्यात यावी तसेच पूर्णत्वास गेलेल्या कामांचा अहवाल समितीला सादर करण्यात यावा, अशा सूचनाही डॉ. पाण्डेय संबंधित विभागाला दिल्या. विद्यापीठाकडून उभारण्यात येणाऱ्या लोणार विज्ञान केंद्र व संशोधन प्रयोगशाळेच्या ठीकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामांचा आढावा समितीने घेतला.

याप्रसंगी विभागीय आयुक्त व समिती सदस्यांनी सरोवरातील वाढलेल्या पाण्याचे व वेडी बाभूळ, भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारिततील पापरेश्वर मंदिर, गो-मुख, देवी पॉइंट आदी विविध स्थळांना समितीने भेटी देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

पाहणी दौऱ्यात आणि बैठकीस नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय पुरातत्त्व विभाग,पाटबंधारे विभाग, अमरावती विद्यापीठ,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वनविभाग,आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000