अवयवदाते आणि यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई, दि. २३ : अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील १४९ अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अवयदान चळवळीला यश येत आहे. यासाठी अवयवदात्यांचे कुटुंब, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये, समुपदेशक, पोलीस या यंत्रणांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
यासंदर्भात आरोग्य विभागाला दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अवयवदानाची आकडेवारी वाढली असली एवढ्यावर समाधान न मानता राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होणे आवश्यक आहे. अवयवदान जनजागृतीची गरज आहे.
वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अवयदानासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षात अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. त्यामुळे अवयवदानाची वृत्ती वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे. अवयवदात्याचा मृत्यू झाल्यास आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राज्य शासनातर्फे श्रद्धांजली अर्पण करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला केली आहे.
००००