विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना नागरिकांच्या दारी – केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी

0
9

यवतमाळ, दि. २३ : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पूर्वी सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. आता विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पहिल्यांदाच सरकार आणि यंत्रणा नागरिकांच्या दारी पोहोचत असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.

वणी येथील एसबी लॉन येथे विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत लाभार्थी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्र सरकारच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांच्या लाभार्थ्यांसोबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या सोहळ्याला केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी संवाद साधताना म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे शासकीय यंत्रणा नागरिकांपर्यंत पोहोचून लाभ मिळाला की नाही याची खात्री करीत आहेत. या यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाभार्थी आनंद व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून कोट्यवधी लोक जोडले जात आहेत. मागच्या काळात २०१४ मध्ये देशभरात १४ कोटी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी होते. आज ३२ कोटीहून अधिक लाभार्थी झाले. केंद्र सरकारने २०१६ मध्ये उज्ज्वला योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून देशभरात १० कोटी ३० लाख गॅस सिलेंडर वाटप केले. देशभरात दौरे करतांना जाणवते की, कोट्यवधी लोकांना योजनांचा लाभ मिळत आहे. रेडी पटरीसारखे काम करणाऱ्या गरजूंना व्यवसायासाठी स्वनिधी योजना सुरु केली आहे. या योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्यांना आधार मिळत असल्याचे केंद्रीय मंत्री श्री पुरी यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना सुरु आहेत. प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली. शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी यात्रा तळागाळपर्यंत जात आहे. शेतकरी हिताच्या योजना पोहोचवल्या जात आहेत. पूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतून गावात ५-१० घरे उपलब्ध व्हायची, पूर्वीपेक्षा आता हे प्रमाण वाढले आहे, असे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, रोहयो अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिर योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आदी योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित लाभार्थ्यांना पंचप्रण शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तारेंद्र बोर्डे यांनी केले. त्यांनी वणीसारख्या दुर्गम व आदिवासी भागातील लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मंत्री पुरी आले असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here