‘राष्ट्रीय मतदार दिन’ सोहळ्याचे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजन

मुंबई दि २३ –  भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस २०११ पासून देशभरात २५ जानेवारी रोजी  ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील मतदारांना समर्पित करण्यात आलेल्या या दिवशी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रम आयोजित केले जातात. यंदाचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय मतदार दिन’ महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, जयहिंद महाविद्यालय आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ जानेवारी असा दोन दिवस साजरा केला जाणार आहे.

जयहिंद महाविद्याल, चर्चगेट, मुंबई येथे होणाऱ्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाला राज्य निवडणूक दूत प्रणित हाटे व नीलेश सिंगीत, तसेच डॉ. संतोष पठारे, प्रकाश कुटे, विकास पाटील, संदीप सावंत, निर्मोही फडके, अभिजित देशपांडे उपस्थित राहतील.

पहिल्या दिवशी राज्यभरातील निवडणूक कार्यालयामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वर्षभरात आयोजित केलेल्या जाहिरातनिर्मिती, घोषवाक्य व भित्तिपत्रक या स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या मॅस्कॉटवे लोकार्पणही केले जाणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ जानेवारीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गायक स्वानंद किरकिरे असून अभिनेता सुबोध भावे, गायक मिलिंद इंगळे, राहुल सक्सेना, वैशाली माडे, रॅपर सुबोध जाधव, कस्तुरी आफळे आणि गीतकार समीर सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने येत्या एप्रिलमधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेल्या मतदार जागृती गीताचे या दिवशी लोकार्पण केले जाणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनाच्या या सोहळ्याला मतदार जागृती पथनाट्य, भित्तिपत्रक व इतर साहित्यांचे प्रदर्शन, खेळ यांचे आयोजन केले आहे. मतदार जागृती गीताचे नृत्य सादरीकरण, नवमतदारांना मतदार ओळखपत्र वाटप, मतदान निष्ठेची शपथ ग्रहण, मतदार जागृतीसंबंधी केलेल्या उपक्रमाच्या पुस्तिकेचे प्रकाशन, इत्यादी कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.

२५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने जिल्हा, तालुका आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पातळीवरही विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं