भाडेकरूंच्या सर्व तपशिलाची सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी – पोलीस उपआयुक्त (अभियान) यांचे आवाहन

मुंबई, दि. 25 : समाजविरोधी घटकांकडून सार्वजनिक शांतता, मानवी जीवनाला गंभीर धोका आणि त्या कारणास्तव खासगी, सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याची शक्यता असल्याचे आढळून आले आहे. भाडेकरूच्या वेशात दहशतवादी, समाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्ये, दंगली, भांडणे आदी घडू नयेत म्हणून घरमालक, भाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे. त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही घर, मालमत्ता, हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, मुसाफीर खाना हा व्यवसाय करणाऱ्या जागा मालकाने कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे. अशा भाडेकरूंचे सर्व तपशील त्वरित www.mumbaipolice.gov.in/TenantForm?ps_id=0 या सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन नोंद करावी, असे आवाहन पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी विशाल ठाकूर यांनी एका आदेशान्वये केले आहे.

भाडेकरू व्यक्ती परदेशी असेल, तर मालक आणि परदेशी व्यक्ती यांनी त्याचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट तपशील, ठिकाण, जारी करण्याची तारीख, वैधता सादर करावी. व्हिसाबाबत व्हिसा क्रमांक, श्रेणी, ठिकाण आणि जारी करण्याची तारीख, वैधता, नोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.  हा आदेश 8 मार्च 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल.

००००

निलेश तायडे/विसंअ