भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे, दि. २६ : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमास पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी  डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात पुणे शहर, ग्रामीण, पिंपरी-चिंचवड पोलीस दल पुरुष व महिला, पुणे शहर पोलीस आयुक्तालय परीमंडळ १ ते ५, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १ व २, लोहमार्ग (महिला), गृहरक्षक दल, वनविभाग पुरुष व महिला, वाहतूक विभाग दुचाकीस्वार, डायल ११२ वाहन, वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, वरुण वाहन दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका १०८, बालभारती, अंमली पदार्थ शोधक श्वान पथक, अग्निशमन दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर दर्शन दुगड यांनी केले.

यावेळी महाळुंगे पोलीस ठाण्याचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर तसेच येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील सुभेदार सतिश बापुराव गुंगे, नामदेव संभाजी भोसले, हवालदार नवनाथ सोपान भोसले यांचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

शहीद नायक बालाजी डुबुकवाड यांच्या पत्नी श्रीमती अर्चना डुबुकवाड यांचा महाराष्ट्र शासनातर्फे ताम्रपट देऊन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३ अंतर्गत जिल्हास्तरावर बारामती तालुक्यातील काऱ्हाटी या गावाला प्रथम, पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि चांबळी या गावांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री.पवार यांच्या हस्ते एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रातिनिधिक स्वरूपात स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमाला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

000