आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने एका संघर्षशील अध्यायाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ३१ : ज्येष्ठ नेते, आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने पाणी प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा नेता हरपला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारे, विधिमंडळात जोरदार आवाज उठवणारे निर्भिड नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, खानापूर-आटपाडी मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी सातत्याने लढा देणाऱ्या आमदार अनिल बाबर यांचे जीवन संघर्षशील होतं. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लोकशाही मार्गाने आंदोलने केली. त्यांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे तरुण आमदारांसाठी मार्गदर्शक  होती. त्यांच्यासारख्या नेतृत्वाचे निधन ही महाराष्ट्राच्या राजकारणाची, पाणी प्रश्न चळवळीची मोठी हानी आहे. आमदार अनिल बाबर यांचे जीवन हे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शन, प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

०००