राष्ट्रीय छात्रसेना पथकाची कामगिरी गौरवास्पद – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. १ : राज्याची गौरवशाली परंपरेला कायम ठेवत, महाराष्ट्र संचालनालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या सैनिकांनी पुन्हा एकदा नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन शिबीर २०२४ मध्ये सतत तिसऱ्यांदा प्रधानमंत्र्यांचा बॅनर जिंकून उत्कृष्ट कामगिरीने आपली क्षमता सिद्ध केली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय छात्र सेना, संचालनालय येथे एनसीसी कॅडेट्सनी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन शिबीर २०२४ मध्ये सतत तिसऱ्यांदा पंतप्रधानांचा बॅनर जिंकल्याबद्दल त्यांचे स्वागत करुन बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

संपूर्ण भारत जल सेना स्पर्धेत प्रथम क्रमाक, शूटिंगमध्ये द्वितीय क्रमांक, वायू सेनामध्ये द्वितीय क्रमांक, थल सेनामध्ये तृतीय क्रमांक तसेच 2023-24 चे उत्कृष्ट छात्र कॅडेट वॉरंट ऑफिसर खुशी (प्रथम बेस्ट कॅडेट, वायू सेना), कॅडेट कॅप्टन सृष्टी मोरे (द्वितीय छात्र, जल सेना), फ्लाइंग कॅडेट प्रीतिलता साहू (द्वितीय छात्र वायू सेना) यांचा मंत्री श्री. बनसोडे यांनी बक्षिस देऊन सत्कार केला.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, एनसीसी च्या सर्व उपक्रमांसाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. धुलाई, प्रवास आदी भत्यात भरीव वाढ करण्यात येईल. अधिकारी, मार्गदर्शकांनी संघात आत्मविश्वास निर्माण केला आणि छात्र सैनिकांनी परिश्रम घेत यश प्राप्त केले.

सन १९९८-९९ नंतर सलग तीन वर्षे प्रधानमंत्री बॅनर जिंकून हॅट्रिकचीही हॅट्रिक (२०२२, २०२३, २०२४) करण्याची किमया करीत आपल्या एनसीसी महाराष्ट्राच्या पथकाने या वर्षी प्रधानमंत्री बॅनर जिंकला आहे. आतापर्यंत महाराष्ट्र निदेशालयाने (Maharashtra Directorate) २३ वेळेस प्रधानमंत्री बॅनर जिंकला आहे. नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये अप्रतिम कामगिरीने प्रभावित झालो असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

एनसीसी ही राष्ट्राची सर्वात मोठी एकसंघ शक्ती आहे आणि राज्याच्या विविध भागातून आलेल्या तरुणांना एकत्र आणून एकता, धर्मनिरपेक्षता आणि अखंडतेचे दर्शन घडविते. एनसीसी कॅडेटस ‘एकता आणि अनुशासन’ या ब्रीद वाक्यासाठी वचनबद्ध आहेत. यावर्षी भारतीय सेनादलामध्ये एकूण ३९ छात्र अधिकारी पदासाठी तसेच अग्निवीरसाठी १२३७ छात्रांची निवड झाली आहे. ही देशात सर्वोत्तम कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिन शिबीर- २०२४ मध्ये १ लाख १५ विद्यार्थ्यांपैकी १२० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल सर्व कॅडेट्सना तयार करणारे अधिकारी वर्ग आणि महाराष्ट्र एनसीसी संचालनालय यांचे मंत्री श्री. बनसोडे अभिनंदन केले.

एनसीसी महाराष्ट्रचे अतिरिक्त महासंचालक, मेजर जनरल योगेंद्र सिंग, विशिष्ट सेवा मेडल प्राप्त  उपमहासंचालक, ब्रिगेडिअर विक्रांत कुलकर्णी, संचालक, कमोडोर सत्पाल सिंग, राज्यातील एनसीसीच्या सात ग्रुप्सचे ग्रुप कमांडर्स आणि विजेत्या पथकाचे कमांडर कर्नल एम. डी. मुथय्याजी क्रीडा विभागाचे आणि एनसीसीचे अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

0000

राजू धोत्रे/विसंअ/