मुंबई, दि. २ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ३ ते ५ फेब्रुवारी, २०२४ दरम्यान सायंकाळी ६ ते १० वेळेत यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन होणार आहे. शनिवार, ३ फेब्रुवारी २०२४ रोजी संजीवनी भेलांडे यांच्या शास्त्रीय गायनाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर श्री आशिष रानडे यांचे शास्त्रीय गायन होईल.
अंकिता जोशी, कलाकार रवी चारी यांच्या वाद्य संगीताचा कार्यक्रम होईल आणि सुप्रसिद्ध गायिका रागेश्री वैरागकर सादरीकरण करतील. रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४ रोजी रमाकांत गायकवाड यांच्या शास्त्रीय गायनाने सुरुवात होईल, शास्त्रीय गायिका मधुवंती बोरगावकर यांच्या गायनाच्या सादरीकरणाचा कार्यक्रम होईल. पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांचे देखील सादरीकरण होईल, अभिजित पोहनकर यांच्या वाद्य संगीताच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होईल, गायिका सानिया पाटणकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल, तर सोमवार ५ फेब्रुवारी, २०२४ रोजी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्तीधारक यश कोल्हापुरे, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्तीधारक मृणालिनी देसाई यांचे सादरीकरण होईल. छत्रपती संभाजीनगर येथील गायिका चंदल पाथ्रीकर यांचे गायन होईल. नंदिनी शंकर यांचे वाद्य संगीताचे सादरीकरण होईल. अर्चिता भट्टाचार्य यांचे गायन होईल आणि शास्त्रीय संगीत गायिका मंजुषा पाटील यांचे गायन सादरीकरणाने या समारंभाची सांगता होईल. सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.
३ ते ५ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत होणाऱ्या या शास्त्रीय संगीत महोत्सवाचा रसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
000
दीपक चव्हाण/विसंअ/