राज्यपालांच्या हस्ते  प्रथम ‘विश्व राजकपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार’ वितरण

पुणे, दि.३: कपूर कुटुंबाने आपल्या कर्तृत्वाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या विकासात आणि उत्कर्षात मोलाचे योगदान दिले आहे. राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न आणि चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविणारे कलाकार होते, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी प्रथम ‘विश्व राजकपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार’ वितरण सोहळ्यात काढले.

श्री ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस डोम येथे आयोजित माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे तर्फे देण्यात येणारा प्रथम ‘विश्व राजकपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड, कुलगुरु डॉ.मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, प्रसिद्ध चित्रपट निर्माते किरण शांताराम, प्रख्यात लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक एन. चंद्रा, साहित्यकार सिद्धार्थ काक, अभिनेते गजेन्द्र चौहान उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, भारतीय चित्रपट क्षेत्राच्या सुवर्णयुगात राज कपूर यांच्यासारख्या महान कलाकाराचा उदय झाला. राज कपूर यांनी आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत अनेक वर्षे रुपेरी पडद्याची शोभा वाढविली. विविधरंगी भूमिकांद्वारे  त्यांनी प्रेक्षकांना हसविले, रडविले आणि प्रेम दिले. चित्रपटांच्या माध्यमातून त्या काळातील सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला.

श्री. बैस पुढे म्हणाले, त्यांच्या काळात भाषा आणि सांस्कृतिक विविधतेवर मात करत समाजातील विविध घटनांची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांनी समाजाला एकजूट केले होते. सामान्य माणसाशी जोडल्या गेलेल्या त्यांच्या भूमिकांमधून सामान्य माणसाच्या आकांक्षा, त्याचा संघर्ष आणि सन्मान प्रतिबिंबीत झाला आहे. भारतासह रशिया, इजिप्त, मध्य पूर्व आशिया तसेच दक्षिण अमेरीकेतही त्यांचे चित्रपट गाजले. या पुरस्कारामुळे स्व. राज कपूर यांच्या स्मृती चिरंतन राहतील, असे त्यांनी सांगितले.

पृथ्वीराज कपूर यांच्यानंतरही कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांनी चित्रपट क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. या कुटुंबातील सदस्यांनी किमान ३०० पेक्षा अधिक चित्रपटात अभिनय, निर्मिती, दिग्दर्शनाचे कार्य केले. भारतीय चित्रपटांच्या सुवर्णयुगात पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्यासह अनेक अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार, कथा लेखक आणि गीतकारांनी केलेले कार्य स्मरणीय आहे. रचनात्मक आणि कलात्मक अभिव्यक्तीचा तो काळ होता. याच काळातील चित्रपट मनोरंजनासोबत प्रेरणा देणारे होते. देशातील बदलत्या सामाजिक प्रश्नांचे आणि घटनांचे प्रतिबिंब त्या काळातील चित्रपटात दिसून येत होते. याच काळात राष्ट्रीय एकता बळकट करण्याचे महत्वाचे कार्य भारतीय चित्रपटांनी केले, असे राज्यपाल म्हणाले.

चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राच्या सुवर्ण युगाचा साक्षीदार असल्याचे समाधान आपल्याला लाभले असून स्व.राज कपूर यांच्या अभिनयाचा चाहता असल्याचेही श्री.बैस यावेळी म्हणाले.

एमआयटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड यांनी पृथ्वीराज कपूर आणि कपूर कुटुंबियांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्काराची सुरुवात केल्याचे आणि दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी किरण शांताराम यांनीही विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाला चित्रपट व नाट्य क्षेत्रातील मान्यवर, विविध विभागांचे प्रमुख तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘विश्व राज कपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार’ रणधीर कपूर यांच्यावतीने आदिनाथ मंगेशकर यांनी स्वीकारला. स्वर्गीय गायक मुकेश यांच्या नावाने गायक नील नितिन मुकेश यांना जाहीर करण्यात आलेला पुरस्कार मुकेश शर्मा यांनी स्वीकारला.

कार्यक्रमापूर्वी एमआयटी विद्यापीठाच्या परिसरातील राज कपूर यांच्या समाधीला आणि स्मृती संग्रहालयास राज्यपाल रमेश बैस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

0000