उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले बाबर कुटुंबियांचे सांत्वन

सांगली, दि. ५ (जिमाका) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन धीर दिला. खानापूर – आटपाडी मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे दि. ३१ जानेवारी रोजी निधन झाले.

खानापूर तालुक्यातील गार्डी येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी भेट घेऊन दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव अमोल आणि सुहास बाबर यांच्यासह बाबर कुटुंबियांचे सांत्वन केले व आस्थेने विचारपूस करून धीर दिला. तत्पूर्वी त्यांनी अनिल बाबर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी दोन्ही मंत्री महोदय दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या आठवणी जागृत करताना भावूक झाले.

बाबर कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून, त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.