जिल्ह्यातील घरकुल योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : पालकमंत्री दादाजी भुसे

0
16

नाशिक, 6 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात विविध घरकुल योजनांतर्गत प्राप्त प्रस्तावांमधील आवश्यक बाबींची पूर्तता करून घरकुलांची  कामे जलदगतीने मार्चअखेर पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी  उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे आयोजित घरकुल योजनांचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस आमदार माणिकराव कोकाटे, सीमा हिरे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, सहायक आयुक्त समाज कल्याण देविदास नांदगांवकर,सहायक आयुक्त नगरपालिका प्रशासन शाम गोसावी, सहायक प्रकल्प अधिकारी, कळवण श्री. जानगर यांच्यासह तालुक्यांतील गटविकास अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मोदी आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, आदिम जमाती आवस योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना या घरकुल योजनांसह पीएम जनमन योजनेचाही आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेत नांदगाव, मालेगाव, कळवण, बागलाण व येवला तालुक्यातील विशेष अभियान राबवून दिलेल्या लक्षांकानुसार उर्वरित राहिलेली घरकुलांच्या कामांसाठी अधिकारीस्तरावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी व मार्च पर्यंत कामे पूर्ण करावीत त्यासोबतच अधिकच्या घरकुलांसाठीचे नवीन प्रस्तावही त्वरेने सादर करून मंजूर करून घेण्याच्या सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या.

पालकमंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले, शबरी घरकुल योजनेसाठी शासन स्तरावर अधिकचा लक्षांक मिळणार आहे. त्यादृष्टीने सर्व गट विकास अधिकारी यांनी आपआपल्या तालुक्यांतील घरकुलांचे प्राप्त घरकुलांचे प्रस्ताव नाशिक व कळवण प्रकल्प अधिकारी यांना सादर करून यातून जे प्रस्ताव प्रात्र ठरतील ते प्रस्ताव तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना प्रकल्प कार्यालयांनी सादर करावेत. रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलांसाठी ग्रामपातळीवर पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करावे व प्रत्येक गावातील ग्रामसेवक यांच्याकडून पात्र लाभार्थ्यांचा दाखला प्राप्त करून पुढील बैठकीत सादर करावी. त्याचप्रमाणे घरकुलांच्या बाबतीत शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे शासन निर्णयानुसार नियमित करून घेण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या. यावेळी पालकमंत्री श्री.भुसे यांनी विविध घरकुल योजनांचे प्राप्त उद्दीष्टे, पूर्ण झालेली घरकुले,  प्रगतीपथावर बांधकाम सुरू असेलेली घरकुले व अपूर्ण असलेली घरकुले यांचा तालुकानिहाय आढावा घेतला. बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्याच्या आदेशही पालकमंत्री श्री. भुसे दिले.

जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाईचा घेतला आढावा

ऑगस्ट 2024 अखेपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल याप्रमाणे सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आढावा बैठकीत दिल्या. ते म्हणाले, शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील शेतातील पिके अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवून कोठेही खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शासन नियमानुसार टंचाई काळात शेतकऱ्यांकडून सक्तीची वीजदेयक वसुली न करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.
0000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here