त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज पौषवारीनिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

0
34

नाशिक, 6 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा): त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज पौषवारी यात्रेनिमित्त समाधीस्थळ येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज पहाटे महापूजा करण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील वारकरी दाम्पत्य मोहन धानेकर यांचा सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. त्यादृष्टीने विधिवत महापूजेनंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पौष वारीनिमित्त होणाऱ्या यात्रास्थळाची तसेच यात्रेस आलेल्या वारकरी व भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत समाधान बोडके, तुकाराम भोये, संस्थांनचे अध्यक्ष निलेश गाढवे, कांचनताई देशमुख, विश्वस्त आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना नाथांच्या चरणी केली. दिंड्यांची आणि वारकऱ्यांची संख्या वाढल्याने भाविकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली त्यात या संस्थानाच्या विकासापासून ते वारकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. यात्रोत्सवाचे चांगले नियोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विश्वस्तांचे त्यांनी अभिनंदन केले.

येणाऱ्या काळात त्र्यंबकेश्र्वर येथे बैठक घेण्यात येईल, कुंभमेळा आराखड्यात समावेश करून अजून विकासात्मक कामे करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. यात्रोत्सव काळात येणा-या वारकरी, भाविक, नागरिक यांना कुठल्याही प्रकारची अडचण येवू नये याकरीता आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

त्यांनतर येथे आलेल्या दिंडीतील संताचे पालकमंत्री श्री.भुसे यांनी भेट घेवून दिंडीत सुरू असलेल्या भजनात मनोभावे रममाण झाले.
000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here