सामाजिक न्याय विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’

 

              मुंबई, ‍‍दि. ७ : राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे. तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने निर्गमित केला आहे.

              सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण (पॉप्युलेशन बेस्ड स्क्रिनिंग) व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल.

            या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते यांची माहिती गोळा करणे इ. कामे नोडल एजन्सी/केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था (CPSU) यांच्या माध्यमातून आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्याद्वारे करण्यात येईल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरीता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरीता आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली  समिती गठीत करण्यात करण्यात येईल.असेही नमूद करण्यात आले आहे.

 

                                              0000

शैलजा पाटिल/वि.स.अ