सोनगाव येथील पुलाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

0
13
सातारा दि.7 (जि.मा.का) : सोनगाव तालुका सातारा येथील उरमोडी नदीवर नाबार्ड मार्फत उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या निर्णयांमुळे गरीब जनतेची आर्थिक उन्नती – मंत्री रवींद्र चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे देशातील गोरगरीब जनतेची आर्थिक उन्नती झालेली आहे. ग्रामपंचायत सक्षम व्हाव्यात म्हणून चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्यामुळे ग्रामीण विभागात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. गोरगरीब जनतेचीही राष्ट्रीय बँकेत खाते असावे या हेतूने जनधन योजना लागू केली. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यात आले. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी केंद्र शासने किसान सन्मान योजना अंतर्गत सहा हजार राज्य शासनाच्या नमो सन्मान योजनेअंतर्गत सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये खात्यावर जमा करीत आहे. यातून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केंद्र राज्य शासन करीत आहे,असेही श्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
कोरोना महामारीच्या काळात कोणीही उपाशी राहू नये म्हणून सर्वांना केंद्र शासनामार्फत मोफत अन्नधान्य देण्यात आले. त्याचबरोबर कोरोनाने कोणीही दगावणार नाही यासाठी कोरोना प्रतिबंधक लस ही देशातील नागरिकांना मोफत देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे सांगून मंत्री श्री. चव्हाण यांनी सातारा तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाच्या कामांना शासन गती येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार श्री. भोसले म्हणाले, केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा हिताच्या अनेक निर्णय घेतले. यामध्ये सहकारी साखर कारखान्यांकडील कर माफ केला. त्यामुळे सहकारी साखर कारखाने अधिक सक्षमपणे सुरू आहेत. राज्य शासनाने शाळा अंगणवाड्यांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. उरमोडी धरणाच्या पाण्यामुळे सातारा तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. या धरणाचे पाणी माण खटावला जात आहे. सातारा तालुक्यात पर्यटन वाढीच्या दृष्टीने अनेक कामे सुरू आहेत या कामांना गती द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या लोकार्पण प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here