पार्ले गावातील विविध विकासकामांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

सातारा दि.७ : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील रस्ते चांगले व्हावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
पार्ले तालुका कराड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील गावनिहाय रस्त्यांच्या कामाची यादी तयार करा. या कामांना निधी देण्याचे काम राज्य शासन करेल. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम राज्य शासन करीत असून यासाठी कटिबद्ध असल्याचेही  त्यांनी सांगितले.
पार्ले गावाच्या विविध विकास कामांना निधी दिल्याबद्दल आमदार श्री.गोरे यांनी आभार मानून यापुढेही विकास कामांना अधिकचा निधी द्यावा अशी अपेक्षाही  यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी व पार्ले गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.