ग्रंथाबरोबर मैत्री करणे काळाची गरज – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. ८ (जिमाका): वाचाल तर वाचाल, जो वाचन करतो तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. सुख, दु:खात ग्रंथ नेहमी आपल्या सोबत असतात. ग्रंथाबरोबर मैत्री करणे काळाची गरज आहे, असे आवाहन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

       जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. ८ व ९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील स्मारक, जुना स्टेशन चौक, सांगली येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते पार पडले.  यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, अप्पर तहसिलदार अश्विनी वरूडे, सहायक ग्रंथालय संचालक पुणे शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी ग्रंथदिंडी सोहळ्याचा शुभारंभ महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते ग्रंथपूजनाने झाला.

       पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यासह इतर महापुरूषांचे चरित्र वाचल्याने मोठमोठ्या संकटावर मात करण्याची ताकद मिळते.  मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. मराठी भाषेसाठीही शासनस्तरावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. यासाठी मराठी भाषा विद्यापिठाची निर्मिती केली आहे. पुस्तक हा आपला साथी बनवा, एकाकीपण कधीच येणार नाही. वृद्धापकाळही सुखाचा होईल. वाचन आणि संगिताची आवड तुम्हाला जीवनभर आनंदी ठेवेल. पुस्तकाची, वाचनाची आवड धरल्यास यश निश्चित मिळते. ग्रंथोत्सवामध्ये लावण्यात आलेल्या स्टॉलधारकांनी विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये पुस्तके द्यावीत, असे आवाहन पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी केले.

       ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने म्हणाले की, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे यासाठी साहित्यिकांसह इतर सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

       यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात यांनी मनोगत व्यक्त केले. सहायक ग्रंथालय संचालय शालिनी इंगोले यांनी ग्रंथोत्सवाची पार्श्वभूमी व महत्त्व विशद केले.

       जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. तांत्रिक सहायक आवजी गलांडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास ग्रंथप्रेमी, वाचक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००