सांगली दि. ८ (जिमाका): शासन सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन, प्रत्येक विषयाला प्राधान्य देत असून गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या सर्व कामांना गती देण्याचे काम करीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
हरिपूर ते कोथळी या गावाला जोडणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलाचे लोकार्पण सार्वजनिक मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे होते. कार्यक्रमास खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, सहायक कार्यकारी अभियंता अमर नलवडे, कनिष्ठ अभियंता अभय क्षीरसागर, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार नितीन शिंदे, हरिपूर च्या सरपंच राजश्री तांबेकर, मकरंद देशपांडे, प्रकाश ढंग यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, हरिपूर ते कोथळी दरम्यानच्या कृष्णा नदीवरील पुलामुळे सांगली व कोल्हापूरमधील अंतर फार कमी झाले आहे. संपूर्ण देशामध्ये रस्त्यांचे जाळे एक वेगळ्या पद्धतीने पसरताना दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चांगले काम करीत आहे. राज्यात जवळपास ६ हजार किलोमीटर रस्त्याच्या कामांना मान्यता मिळाली आहे. शासन वेगवेगळ्या विषयाला प्राधान्य देऊन काम करीत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले की, हरिपूर ते कोथळी पुलामुळे सांगलीच्या वैभवात भर पडली आहे. या पुलामुळे कोल्हापूरला जाण्यासाठी १० ते ११ किलोमीटर अंतर कमी झाले असून चांगली सुविधा झाली आहे.
हरिपूर ते कोथळी या गावाला जोडणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलाची लांबी २१० मीटर असून १० आर.सी.सी. गाळे, बॉक्सरिटर्न २१ मीटरचे तीन आर.सी.सी. गाळे, पुलास एम एस रेलिंग, जोडरस्ते हरिपूर बाजूस ९० मीटर व कोथळी बाजूस १३० मीटर व इतर अनुषंगिक बाबींची तरतूद करण्यात आली आहे. या कामावर आजअखेर २५ कोटी ९७ लाख ८५ हजार रूपये खर्च झाला आहे.
०००