आदर्श शेतकरी पुरस्कार शेतकऱ्यांना प्रेरणा, ऊर्जा देतील – पालकमंत्री दादाजी भुसे

0
14

नाशिक, दि. १० (जिमाका) : ज्या शेतकऱ्यांनी उत्तम शेती करून समाजापुढे आदर्श ठेवला, अशा शेतकऱ्यांचा कृषी व संलग्न क्षेत्रात उत्कृष्ठ कामाकरीता आत्मा अंतर्गत आदर्श शेतकरी पुरस्कार २०२४प्रदान करताना आनंद होत असून या पुरस्काराच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची ओळख होवून प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यातर्फे नाशिक कृषी व नव तेजस्विनी महामहोत्सव २०२४ चे १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन मंत्री श्री. भुसे यांनी यांच्या हस्ते झाले.  यावेळी प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ, जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री सन्मान निधी योजना चालवली जाते तर महाराष्ट्र शासनाद्वारे ‘नमो शेतकरी योजना’ राबविण्यात येत आहे. १ रुपयात पीक विमा देणारे देशात महाराष्ट्र एकमेव राज्य असल्याचे मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

इगतपुरी येथे १० कोटी रुपयाचे कृषी भवन मंजूर

शेतकऱ्यांच्या सोईसाठी नुकतेच इगतपुरी येथे १० कोटी रुपयांचे कृषी भवन मंजूर झाले आहे. तसेच मालेगाव येथे पाच कृषी महाविद्यालये मंजूर असून त्याचेही काम प्रगतीपथावर आहे. या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार असून त्याचे चांगले परिणाम येत्या काळात दिसून येतील. यंदा पाऊस कमी झाला असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पेयजलाचे व शेतीच्या पाण्याचे नियोजनाची कार्यवाही सुरु असून प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे, यासाठी सूक्ष्म नियोजन केले जाईल.

कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना पोहचविणार

कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्याती विषयक काही अडचणी आहेत. या सर्व अडचणी राज्यपातळीवर पोहचवून केंद्रापर्यंत पोहचविण्याचे काम शासन हाती घेणार असून यामाध्यमातून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. भुसे यांनी शेतकऱ्यांना दिला.

मंत्री श्री. भुसे यांनी महोत्सवाचे उद्घाटन करून प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच यावेळी मातीपूजन देखील करण्यात आले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here